दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. तशातच आता विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्यात किसान यात्रा करत निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. राज्यातील जनतेने या नव्या शेतकरी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरावे आणि चालत, सायकलवर, मोटरसायकलवर किंवा ट्रॅक्टरवर बसून या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे अखिलेश यादव यांनी सांगितले होते. परंतु, या आंदोलनात सामील होण्याआधीच त्यांना घरातच रोखण्यात आलं.

अखिलेश यादव लखनौ येथील आपल्या घरून कन्नौजला जाणार होते आणि शेतकरी आंदोनात सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व करणार होते. मात्र, त्यांना घराबाहेर पडण्यापासूनच रोखण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घराबाहेर सकाळपासूनच बॅरिकेट्स लावण्यात आले आणि दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावर भाजपा खासदार सनी देओल यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा- शेतकऱ्यांसाठी कायपण… मुस्लीम तरुणांनी आंदोलक शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘लंगर’ सेवा

“अखिलेश यादव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार या कल्पनेनेच सरकारला धडकी भरली. अखिलेश यादव आंदोलनाच्या ठिकाणी जाणार होते आणि ट्रॅक्टर चालवून शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करणार होते. सर्वप्रथम केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर जाचक असे तीन कायदे लादले. आणि आता राजकीय पक्षांना या न पटणाऱ्या गोष्टींचा निषेध करण्यापासून रोखलं जात आहे. हे लोकशाहीच्या तत्वांच्या विरूद्ध आहे”, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री राजेंद्र चौधरी यांनी केली.

विक्रमादित्य मार्ग येथे अखिलेश यादव यांचे निवासस्थान आहे. तेथे सकाळपासून समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी तेथील परिसर रिकामा केला. तसेच समाजवादी पक्षाचे दोन बडे नेते आशु मलिक आणि राजपाल कश्यप यांना ताब्यात घेत पोलिस लाइनला पाठवण्यात आले. तसेच या परिसरात दंगलविरोधी पथकाची वाहनेदेखील तैनात करण्यात आली आहेत.