जमीन अधिकाधिक कसदार करण्यास सरकार बांधील असल्याचे अधोरेखित करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शनिवारपासून देशातील शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे (सॉइल हेल्थ कार्ड) देण्याची येतील, असे जाहीर केले.

जागतिक भूदिनानिमित्त जमीन अधिकाधिक कसदार करण्याच्या आमच्या बांधीलकीशी ठाम असल्याचा निर्धार करू या, भूआरोग्य उत्तम असल्यास शेतकऱ्यांना अधिक धन मिळेल, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे. शनिवारपासून यासाठी देशव्यापी पुढाकार घेण्यात येत असून, शेतकऱ्यांना भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत, शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे.

भूआरोग्य सुधारावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा एक भाग म्हणून भूआरोग्यपत्रे देण्यात येणार आहेत आणि जमिनीशी निगडित प्रश्नांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदी यांनी राजस्थानमधील सुरतगड येथे ही योजना सुरू केली. जमिनीच्या खालावलेल्या दर्जाला आळा घालणे आणि शेतमालाचे उत्पादन वाढविणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे १४.५ कोटी शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांत भूआरोग्यपत्रे दिली जाणार आहेत.