कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून मोदी सरकारला मोठा धक्का दिला आहे. कृषी विधेयकांवरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आता या वादामध्ये काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी उडी घेतली आहे. झा यांनी ट्विटवरुन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होतं ते भाजपानं केलं असं म्हणत या विधेयकांबद्दल भाजपा आणि काँग्रेसची भूमिका सारखीच होती असं म्हटलं आहे. झा यांना १४ जुलै रोजी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर अनेकदा ते पक्षाच्या भूमिकांबद्दल उघडपणे आक्षेप घेताना दिसत असून त्यांनी आत कृषीविषयक विधेयकांवरुन सुरु असणाऱ्या वादामध्ये काँग्रेसची भूमिकाही सध्याच्या सत्ताधारी भाजपासारखीच असल्याचे म्हटलं आहे.

“मित्रांनो, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही एपीएमसी कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. शेतमालावरील निर्बंध उठवण्याचं आश्वासन दिलेलं. कृषीविषयक विधेयकांच्या माध्यमातून मोदी सरकारने हेच केलं आहे. या विषयासंदर्भात भाजपा आणि काँग्रेस एकाच पानावर (एकाच विचारसरणीचे) आहेत,” असं झा यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

काँग्रेसह प्रादेशिक पक्षांचा विरोध

मोदी सरकारच्या कृषी सुधारणांना प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांतून प्रखर विरोध होत असून, हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. देशातील २५० संघटनांनीही विधेयकांना विरोध केला असून, बुधवारी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलनही केले. गेल्या आठवडय़ात पंजाब व हरयाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे धाव घेतली होती. काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तेलुगु देसम अशा बहुतांश प्रादेशिक पक्षांनीही विधेयकांना विरोध केला. त्यामुळे अकाली दलावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. पंजाबमधील राजकीय हितसंबंधांना बाधा पोहोचत असल्याचे दिसू लागल्याने अकाली दलाने भाजपला थेट विरोध करत, विधेयकांवर चर्चा केली नसल्याचा आरोप केला.

झा यांनी यापूर्वीही काँग्रेसविरोधात घेतली आहे भूमिका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जुलै रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याने तसेच पक्षाची शिस्त मोडल्याने संजय झा यांना तत्काळ प्रभावाने पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी झा यांनी एक मोठा खुलासा केला होता.  काँग्रेस पक्षातील १०० नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं, असा दावा झा यांनी केला होता. तसेच एका लेखामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी विचारांबद्दल असहिष्णुता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस भाजपावर ‘चुकीच्या पद्धतीने लोकशाही’ चालवण्याचा आरोप करते. तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षामध्ये मात्र राजेशाही संस्कृतीला पाठिंबा देते असा टोलाही झा यांनी लगावला होता. आता काँग्रेस कृषी विधेयकांना विरोध करत असतानाच झा यांनी पुन्हा काँग्रेसविरोधात भाष्य केलं आहे.

काय आहे या विधेयकांमध्ये?

कषीक्षेत्र ‘खुले’ करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. त्यातून शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी सुधारणा होणार असल्याचा दावा केला जात होता. आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी असल्याचे कारण देत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.