भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्याची मागणी

तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात १११ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले आहे.

तमिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी सांगितले की, राज्यातील १११ शेतकरी वाराणसीतून मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अय्याकन्नू हे राष्ट्रीय दक्षिण भारतीय नद्या आंतरजोडणी शेतक री संघटनेचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्यातून भाजपला आमच्या मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट करायला लावण्याचा हेतू आहे. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळण्याची  प्रमुख मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

दिल्लीत २०१७ मध्ये १०० दिवस आंदोलन करण्यात आले होते त्याचे नेतृत्व अय्याकन्नू यांनी केले होते. जर भाजपने आमच्या मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात केला तर १११ उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय आम्ही मागे घेऊ असे त्यांनी सांगितले. जर भाजपने जाहीरनाम्यात आमच्या मागण्यांचा समावेश केला नाही तर आमचे १११ उमेदवार मोदी यांच्या विरोधात लढतील.

या निर्णयाला अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा पाठिंबा आहे असे ते म्हणाले. हा मुद्दा इतर पक्षांना जाहीरनाम्यात समाविष्ट करायला न लावता केवळ भाजपलाच लक्ष्य का करता यावर त्यांनी सांगितले की, भाजप अजून सत्ताधारी पक्ष असून मोदी हे पंतप्रधान आहेत. द्रमुक व अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम या पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले असून आमच्या मागण्यांचा समावेश त्यांनी जाहीरनाम्यात केला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

वाराणसीला जाण्यासाठी तीनशे शेतकऱ्यांची रेल्वे तिकिटे काढली असून तिरूवनमल्लाई, तिरूचिरापल्ली येथील शेतकरी वाराणसी येथे जात आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये अय्याकन्नू यांनी दिल्लीत आंदोलन करून त्यात मानवी कवटय़ांचा वापर केला होता.