राजस्थानमधील भाजपाच्या आमदाराने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही टीका करताना कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे बर्ड फ्लूचा आजार देशभरामध्ये पसरेल अशी विचित्र शक्यता या भाजपा आमदाराने व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रामगंज मंडीचे आमदार मदन दिलावर यांनी हा दावा केल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे आंदोलन करणारे लोकं हे दहशथवादी, चोर आणि चोऱ्यामाऱ्या करणारे असू शकतात, असा दावा दिलावर यांनी केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

नक्की वाचा >> मोदींनी पक्षांना दाणे खाऊ घातल्याने पसरला बर्ड फ्लू; ‘सपा’च्या नेत्याने मोदींवर साधला निशाणा

“ते (शेतकरी आंदोलक) बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत. ते ड्रायफ्रूट्स खात आहेत. तसेच ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेकदा ते त्यांचा अवतारही बदलत आहेत. या आंदोलकांमध्ये अनेक दहशतवादी असू शकतात. अनेक चोर, लूटमार करणारेही असू शकतात. हे लोकं शेतकऱ्यांचे शत्रू असू शकतात,” असा दावा दिलावर यांनी व्हिडीओमध्ये केला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशाची किंवा येथील लोकांची चिंता नसल्याचा आरोपही दिलावर यांनी केला आहे. शेतकरी आंदोलन हे एखाद्या पिकनिकप्रमाणे सुरु असल्याचा टोलाही दिलावर यांनी लगावला आहे. “माझ्या अंदाजानुसार चर्चेतून किंवा बळाचा वापर करुन पुढील काही दिवसांमध्ये सरकारने या आंदोलकांना हटवलं नाही तर देशभरात बर्ड फ्लूचा फैलाव होऊ शकतो,” असंही दिलावर म्हणाले आहेत.

विरोधकांची टीका

दिलावर यांच्या या वक्तव्यावरुन आता नवीन वाद सुरु झाला आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतासरा यांनी या वक्तव्यावरुन भाजपाची विचारसणी कळून येते असा टोला लगावला आहे. “आपल्या अन्नदात्यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला तुम्ही पिकनिक तसेच बर्ड फ्लू पसरवण्यासाठी जबाबदार ठरवत आहात का?,” असा प्रश्न दोतासरा यांनी विचारला आहे. दिलावर यांचं वक्तव्य हे लज्जास्पद असल्याचेही दोतासरा यांनी म्हटलं आहे.

बर्ड फ्लूची परिस्थिती काय?

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रावरही सावट

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.