केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतक ऱ्यांनी सोमवारी एक दिवसाचे उपोषण केले. दरम्यान, हे आंदोलन देशाच्या इतर भागात पसरले असून जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणीही निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चेची पुढील फेरी करण्यास आम्ही तयार आहोत, संवादाचा मार्ग संपलेला नाही असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही शेतक ऱ्यांशी संवादास तयार आहोत. तोडगा निघेपर्यंत आमची चर्चेची तयारी आहे.

शेतकरी संघटनेचे नेते बलदेव सिंग यांनी सांगितले, की शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक दिवसभर उपोषण करण्यात आले. आज आंदोलनाचा अठरावा दिवस होता. सकाळी आठ ते पाच या काळात उपोषण करण्यात आले, दरम्यान शेतकरी संघटनांची सरकारशी सुरू असलेली चर्चा अजूनही निर्णायक पातळीवर गेली नसून अधिकाधिक शेतकरी दिल्ली सीमेवर जमले आहेत. शेतकरी संघटनांनी असा दावा केला, की जिल्ह्य़ांच्या ठिकाणी निदर्शने करण्याच्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनीही शेतक ऱ्यांना पाठिंब्यासाठी लोकांना एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन केले होते. केजरीवाल यांनी शेतक ऱ्यांना पाठिंब्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही एक दिवसाचे उपोषण केले. याशिवाय आम आदमी पक्षाचे गोपाल राय, सत्येंदर जैन, अतिशी व राघव चढ्ढा यांनीही पक्ष कार्यालयात उपोषण केले. दरम्यान दिल्ली सीमेवर मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून  सिंघू, उवचाडी, पियावू, मणियारी, सभोली येथे सीमा बंद करण्यात आल्या आहेत.