केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारत बंद पुकारला होता, त्यादरम्यान पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र देशाच्या अन्य भागांमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरयाणामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य महत्त्वाचे मार्ग रोखले तर अनेक ठिकाणी रेल्वे मार्गवरच ठिय्या दिला होता. संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजल्यापर्यंत बंद पुकारला होता. चार शताब्दी गाड्या रद्द करण्यात आल्या.

अन्य ३५ प्रवासी गाड्या थांबविण्यात आल्या आणि मालवाहतूक करणाऱ्या ४० गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर विभागातील गाड्यांची वाहतूक ४४ ठिकाणी विस्कळीत झाली होती.

उत्तर प्रदेशातील बालिया येथे भाकप (एम-एल)च्या २० कार्यकत्र्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीत या बंदचा परिणाम कमी होता, करोल बाग, काश्मिरी गेट, चांदनी चौक, सदर आदी ठिकाणी असलेल्या बाजारपेठा सुरू होत्या. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने टिकरी सीमेवर आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे द्वार काही कालावधीसाठी बंद केले होते. देशाच्या अन्य भागांमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.