प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा दिला.

दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले, “शेतकरी नेत्यांना काही अटींवर ट्रॅक्टर परेडची परवानगी देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या मार्ग सोडून पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्स तोडून प्रतिबंधित भागात प्रवेश केला. शेतकरी नेत्यांनी आम्ही सांगितलं होतं की, त्यांनी कुंडली, मानेसर, पलवल या मार्गावरच ट्रॅक्टर परेड काढावी. मात्र, शेतकरी दिल्लीतच ट्रॅक्टर परेड काढण्यावर ठाम होते.”

“जेव्हा शेतकरी नेत्यांना परवानगी देण्यात आली तेव्हा त्यांना लिखित स्वरुपात सांगण्यात आलं होतं की, त्यांनी ५००० पेक्षा अधिक ट्रॅक्टर परेडमध्ये समाविष्ट होता कामा नयेत तसेच त्यांच्याजवळ कोणतीही हत्यारं असता कामा नयेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांनी पोलिसांच्या निर्देशांचे उल्लंघन करत बॅरिकेट्स तोडून हिंसाचार केला. यामध्ये एकूण ३९४ पोलीस कर्मचारी जखमी झाले काही कर्मचारी तर आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं आहे.”

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, “२५ जानेवारी रोजी रात्री उशीरापर्यंत हे स्पष्ट झालं होतं की, ट्रॅक्टर परेडबाबत शेतकरी नेत्यांसोबत जे निश्चित झालं आहे त्याचं पालन करण्यास शेतकरी तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी ते आक्रमक झाले आणि मंचावरुन त्यांनी भडकाऊ भाषणं दिली. यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट झाला.”

शेतकरी नेत्यांनी धोका दिला

हिंसा घडवून आणल्याचे व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. कोणालाही सोडलं जाणार नाही. जर कुठलाही शेतकरी नेता यामध्ये दोषी आढळला तर त्यावर कायदेशीर करवाई केली जाईल. आमचा करार शेतकरी नेत्यांसोबत झाला होता. त्यांनी आम्हाला धोका दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

टिकैत यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांनी केला हिंसाचार

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, गाजीपूरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत जे शेतकरी उपस्थित होते त्यांनी देखील हिंसाचार घडवून आणला त्यानंतर ते पुढे अक्षरधामकडे गेले. यावेळी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना परत पाठवलं मात्र, काही शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडले आणि लाल किल्ल्यावर पोहोचले.

आत्तापर्यंत १९ लोकांना घेतलं ताब्यात

आत्तापर्यंत १९ लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून ५० जणांकडे चौकशी केली जात आहे. ज्या लोकांनीत तोडफोड केली त्यांनी ओळख पटवली जात आहे. त्यांना अटक केली जाईल. आजवर २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.