22 January 2019

News Flash

कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांचे पाण्यासाठी विक्रमी आंदोलन

कर्नाटकातील हुबळीला महाराष्ट्रातील सोलापूरशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक अनेकदा बंद पाडण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीत ३० मतदारसंघांमध्ये प्रचाराचा मोठा मुद्दा

कर्नाटकच्या गदग जिल्ह्य़ात पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन एक हजार दिवसांचा टप्पा ओलांडून गेले असून, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ३० मतदारसंघांमध्ये हा प्रचाराचा मोठा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.

गदग, धारवाड, बागलकोट आणि बेळगाव या जिल्ह्य़ांच्या ११ तालुक्यांना महादायी नदीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी कर्नाटक रयत सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी गदग जिल्ह्य़ातील नरगुंद शहरात आंदोलन करत आहेत. १६ जुलै २०१५ रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाने १३ एप्रिलला १००३ वा दिवस पाहिला. या तीन वर्षांमध्ये ७५ दिवस नरगुंद शहरातील जनजीवन ठप्प झाले होते, तर कर्नाटकातील हुबळीला महाराष्ट्रातील सोलापूरशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक अनेकदा बंद पाडण्यात आली होती.

पेयजलाची टंचाई हा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील मोठा मुद्दा असल्याची वस्तुस्थिती काँग्रेस व भाजप या दोन्ही मोठय़ा पक्षांनी मान्य केली असल्याने, येत्या निवडणुकांत ३० मतदारसंघांमध्ये तो उफाळून येणार आहे. हा भाग इतका कोरडा आहे, की नरगुंदच्या मुलांना आपली मुलगी देण्यास लोक कां-कू करतात. उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला १५ दिवसांत एकदा पिण्याचे पाणी मिळते; तर हिवाळा व पावसाळ्यात पाणी ८ ते १० दिवसात एकदा येते, असे अयूब खान या स्थानिक दुकानदाराने सांगितले.

येत्या १२ मे ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सत्ताधारी काँग्रेससह भाजप व जद(एस) या विरोधी पक्षांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे नरगुंदच्या आंदोलनाचा उल्लेख केलेला आहे. एकेकाळी या भागात वर्चस्व असलेल्या भाजप पक्षाच्या कामगिरीला गेल्या विधानसभा निवडणुकीत उतरती कळा लागली होती. राज्यात भाजप विजयी झाल्यास या भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. तर, गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असतानाही भाजप केंद्र सरकारच्या मध्यस्थीने महादायी नदीच्या पाण्याच्या मुद्यावर

तोडगा का शोधत नाहीत, असा प्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विचारला आहे.

((   गदग, धारवाड, बागलकोट आणि बेळगाव या जिल्ह्य़ांच्या ११ तालुक्यांना महादायी नदीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी कर्नाटकमध्ये शेतकरी गदग जिल्ह्य़ातील नरगुंद शहरात आंदोलन करत आहेत. ))

First Published on April 17, 2018 4:25 am

Web Title: farmers movement for water in karnataka