News Flash

दिल्लीत आज शेतकऱ्यांचेही ‘पथसंचलन’

एकाच वेळी तीन ट्रॅक्टर मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन

(संग्रहित छायाचित्र)

दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाप्रमाणे मंगळवारी राजधानीच्या परिघावर शेतकऱ्यांचे ‘पथसंचलन’ होणार असून त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जातील.

आठवडय़ाभरातील चच्रेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाना परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली.

पोलिसांकडून दक्षता

दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवरून मोर्चा काढण्यास परवानगी देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती मात्र, दिल्ली पोलिसांनी ती नाकारली. ‘शेतकरी नेत्यांच्या सहमतीने ट्रॅक्टर मोर्चासाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. काही देशविघातक घटक या मोर्चाला धोका पोहोचवू शकतात. त्यामुळे दक्ष राहण्याची गरज आहे’, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सोमवारी शेतकरी नेत्यांशी झालेल्या चच्रेनंतर पत्रकारांना सांगितले. पाकिस्तानात १३ ते १८ जानेवारी या पाच दिवसांत ३०० ट्विटर खाती तयार करण्यात आली असून समाजमाध्यमांच्या आधारे अफवा पसरवून ट्रॅक्टर मोर्चामध्ये अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘आयबी’ युनिटचे आयुक्त दिपेंदर पाठक यांनी दिली.

जय्यत तयारी

शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चाची जय्यत तयारी केली असून सिंघू, टिकरी व गाझीपूर या तीन आंदोलनस्थळावरून तीन ट्रॅक्टर मोच्रे निघतील. या तीनही मोर्चाचे मार्ग ठरवण्यात आले असून ते प्रत्येकी ६२ ते ६८ किमी अंतर पार करून आंदोलनाच्या मूळ ठिकाणी परत जातील. या मार्गावर ट्रॅक्टर संचलनाचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून सुमारे ३ हजार स्वयंसेवक मदतीसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने तनात केले जातील. प्रत्येक ट्रॅक्टरवर जास्तीत जास्त पाच व्यक्ती असतील. त्यांनी चोवीस तासांसाठी शिदोरी घेऊन येण्याची सूचना केली आहे. मद्य बाळगण्यास व सेवनास मनाई केली असून मोठे फलक नेण्याचीही परवानगी नसेल. प्रत्येक मोर्चासाठी शेतकरी संघटनांकडून स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यात ४० सदस्य असून डॉक्टर, सुरक्षा रक्षक, समाजमाध्यम व्यवस्थापक यांचा समावेश असेल. ४० रुग्णवाहिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते करणार असून त्यांच्या मागून ट्रॅक्टर मोर्चा निघेल. ट्रॅक्टरवर तिरंगा असेल, लोकगीते आणि देशभक्ती गीते वाजवली जातील. पंजाब, हरियाणा तसेच, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड अशा विविध राज्यांतून शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

तोडगा निघेल-तोमर

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या निर्धारावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दुसऱ्या कुठल्याही दिवशी ट्रॅक्टर मोर्चा काढता आला असता, पण, त्यांनी २६ जानेवारीला मोर्चा काढण्याची घोषणा केली. मोर्चा शांततेत पार पडणे हे दिल्ली पोलिसांसाठी तसेच, शेतकऱ्यांसाठी देखील आव्हान असेल, असे तोमर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल व आंदोलन संपुष्टात येईल, अशी आशाही तोमर यांनी व्यक्त केली.

ट्रॅक्टर मोर्चा अत्यंत शांततेत काढला जाईल व राजपथावरील पथसंचलनाला कोणताही बाधा पोहोचवली जाणार नाही, असे शेतकरी नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिनी होणारा शेतकऱ्यांचा मोर्चा हा केंद्र सरकारविरोधात आंदोलक शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची धडक

राजपथावरील पथसंचलनाप्रमाणे या ट्रॅक्टर मोर्चातही विविध राज्यांतील सांस्कृतिक रथ-देखावेही पाहायला मिळतील. महाराष्ट्रातून जळगांव, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यांतून लोकसंघर्ष मोर्चाचे सुमारे सहाशे महिला व साडेचारशे पुरूष कार्यकत्रे आंदोलनात सहभागी झाले आहेत.  सिंघू, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवर भेट देऊन सातपुडय़ातील या आदिवासी महिलांनी आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. त्या आदिवासी संस्कृतीची झलक दाखवत शेतकऱ्यांच्या प्रजासत्ताक परडेमध्ये ऐतिहासिक सहभाग नोंदवतील, अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली.

संसदेवर १ फेब्रुवारीला मोर्चा

नवे शेती कायदे रद्द करावेत व किमान आधारभूत मूल्याला कायद्याची हमी द्यावी यासाठी शेतकरी आंदोलन करत असून १ फेब्रुवारी रोजी संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य व क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शनपाल यांनी सोमवारी दिली. शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चच्रेच्या ११ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शुक्रवारी २९ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:27 am

Web Title: farmers movement in delhi today abn 97
Next Stories
1 लशींबाबत अफवा पसरवल्यास कारवाई
2 मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर
3 “भारतीय सैन्य सीमांचे रक्षण करण्यास सक्षम”; राष्ट्रपतींचा चीनला सूचक इशारा
Just Now!
X