अमेठी दौऱ्यावर असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा रोषाला सामोरं जावं लागलं. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी प्रचारावर जोर देत असून अनेक ठिकाणी दौरा करत आहेत. अमेठी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शन करत घोषणाबाजी केली. हे शेतकरी गौरीगंज शहरातील होते. एक तर राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेली आमची जमीन परत करा किंवा आम्हाला रोजगार द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

निदर्शन करणाऱे संजय सिंग यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही राहुल गांधींवर खूप नाराज आहोत. त्यांनी पुन्हा इटलीला निघून जावं. त्यांना इथे राहण्याचा हक्क नाही. त्यांनी आमची जमीन बळकावली आहे’. राजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या सम्राट सायकल फॅक्टरीजवळ हे निदर्शन करण्यात आलं.

1980 पासून या जमिनीचा वाद सुरु आहे. 1980 साली जैन बंधूंनी कंपनी सुरु करण्यासाठी कौसार येथील 65.57 एकर जमीन घेतली होती. पण त्यांना अपयश आल्याने 2014 मध्ये जमिनीचा लिलाव करण्यात आला. न्यायालयाने ही जमीन उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचा निर्णय दिला असतानाही अद्याप राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

याआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर आरोप करत संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता.