News Flash

शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारचा प्रस्ताव नाकारला

चर्चेसाठी सरकारचा पुढाकार, निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करण्यास शेतकऱ्यांचा नकार

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला. (छायाचित्र/रॉयटर्स)

केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सूचवलेल्या पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं असून, संतप्त शेतकरी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाळला.

केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. विशेषतः पंजाब हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

आधी पंजाब व हरयाणात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. दोन दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचे जत्थे दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले. मात्र, करोनाचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून, आज सरकारनं चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दिल्लीतील निरंकारी समागम मैदानावर शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करावं, असा प्रस्ताव केंद्राकडून देण्यात आला. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला असून, दिल्लीतील रामलीला अथवा जंतरमंतर मैदानावरच आंदोलन करू, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिंधू सीमेवर बुरारीतील निरंकारी मैदानावर जाण्यास शेतकऱ्यांकडून नकार दिला जात आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळत, केंद्र सरकारच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 4:50 pm

Web Title: farmers protest farms laws singhu burari nirankari ground delhi police haryana punjab letest updates bmh 90
Next Stories
1 चीनच्या उलट्या बोंबा… करोना विषाणू भारतातूनच जगभरात पसरल्याचा केला दावा
2 इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची दहशतवाद्यांनी केली हत्या
3 पंतप्रधान मोदींनी झायडसच्या टीमची पाठ थोपटली, टि्वट करुन म्हणाले…
Just Now!
X