दिल्लीत सलग अकराव्या दिवशी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून सरकारसोबत होत असलेल्या शेतकरी नेत्यांच्या चर्चाही निष्फळ ठरल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने विधेयक मंजुर करायला घाई केल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही याबाबत सरकारला सांगत होतो, मात्र आमचं ऐकलं गेलं नाही, असा आरोपही पवार यांनी केला आहे.

पवार म्हणाले, “पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी गहू आणि तांदळाचे मुख्य उत्पादक आहेत. हेच शेतकरी आज कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. जर यावर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर देशभरातील शेतकरी त्यांच्या सोबत असतील.”

“जेव्हा कृषी विधेयकं मंजुर केली जात होती. तेव्हा आम्ही सरकारला म्हटलं होतं की घाई करु नका. या विधेयकांना लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवण्यात यावं तसेच यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र, सरकारनं आमचं ऐकलं नाही आणि घाईत विधेयक मंजुर करण्यात आलं. आता सरकारला आपल्या याच घाई-गडबडीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने दिला भारत बंदला पाठिंबा

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, “काँग्रेसने आठ डिसेंबर रोजी भारत बंदला पाठिंबा जाहिर केला आहे. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांवर देखील आंदोलन करणार आहोत. हे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींच्यावतीने टाकलेलं मजबूत पाऊल आहे. आंदोलन यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करु.”