पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला,” अशी टीका करतानाच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कृषी कायद्यांसंदर्भात सल्लाही दिला आहे. पंतप्रधानांनी किसान संमेलनात संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकास्त्र सोडलं.

देशात कृषी कायद्यांवरून घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहे. १५-२० दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलं आहे. कृषी कायदे मागे घेण्याची व हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

“सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदे मागे घ्या,” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते मोदी?

“मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,” असं म्हणत मोदी यांनी सर्व पक्षांना किसान संमेलनात बोलताना आवाहन केलं होतं.