News Flash

तोडग्याबाबत आशावाद

शेतकरी-केंद्र चर्चेची आज सातवी फेरी

वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची सातवी फेरी आज, सोमवारी होणार आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच किमान आधारभूत किमतीस कायद्याची हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या दोन महत्त्वाच्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार असून, तोडगा निघेल, अशी आशा शेतकरी नेते आणि केंद्राला आहे.

दिल्लीच्या सीमांवर ४० दिवसांपासून ठिय्या मांडलेल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांशी गेल्या बुधवारी केंद्राची झालेली सहावी बैठक तोडग्याविना संपली होती. मात्र, त्यात दोन मुद्यांवर सहमती झाली होती. प्रस्तावित वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार असून, वीज वापरावर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणे कायम राहील. तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशातही दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच ‘एमएसपी’च्या मुद्यावर ४ जानेवारीला बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार चर्चेची सातवी फेरी आज होणार आहे.

दोन्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, ही भूमिका शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे. संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मात्र, चर्चेच्या सहाव्या फेरीत दोन मागण्या मान्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिल्लीच्या वेशीवर पावसामुळे पाणी साचले आहे. थंडी आणि पावसामुळे आमचे हाल सुरू असले तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय घरी परतणार नाही, असे सिंघू आणि गाझीपूर सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले. सरकार आमच्या मागण्या मान्य करेल, अशी आशाही गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनीही आजच्या चर्चेतून तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला.

पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल

रात्रभर झालेल्या पावसामुळे दिल्लीच्या वेशींवर ठिय्या मांडलेल्या शेतकऱ्यांचे रविवारी सकाळी हाल झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पाणी साचले. बहुतांश शेतकऱ्यांचे तंबू जलरोधक आहेत. त्यामुळे पावसापासून बचाव झाला तरी पाणी साचल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली, असे सिंघू सीमेवरील शेतकरी गुरविंदर सिंग यांनी सांगितले.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 2:33 am

Web Title: farmers strike in delhi mppg 94
Next Stories
1 राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी
2 राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा
3 मी करोनाची लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही – बाबा रामदेव
Just Now!
X