News Flash

शेतकऱ्यांच्या एकूण ११०९ पैकी ९८६ आत्महत्या महाराष्ट्रात

शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१४ मध्ये २६ टक्क्यांवर पोहोचले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११०९ वर पोहोचली आहे आणि त्यापैकी बहुसंख्य आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत

| March 4, 2015 12:55 pm

संसद प्रश्नोत्तरे
शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१४ मध्ये २६ टक्क्यांवर पोहोचले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ११०९ वर पोहोचली आहे आणि त्यापैकी बहुसंख्य आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, अशी माहिती  लोकसभेत देण्यात आली. एकूण ११०९ पैकी ९८६ आत्महत्या महाराष्ट्रात, ८४ तेलंगणमध्ये आणि २९ झारखंडमध्ये झाल्या आहेत. २०१३ मध्ये ८७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०१२ मध्ये १०४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, सामाजिक-आर्थिक आणि वैयक्तिक कारणास्तव या आत्महत्या करण्यात आल्या आहेत. कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने राज्य सरकारने योग्य उपाययोजना आखाव्यात, असे कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदारिया यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी  ७८ वाघांचा मृत्यू
गेल्या वर्षांत (२०१४) देशात ७८ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत दिली.
देशात २०१३ साली ६८ तर २०१२ साली ८९ वाघांचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक कारणांबरोबरच शिकार हे वाघांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जंगलांमध्ये गस्त वाढवली आहे. वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोची स्थापना केली आहे. तसेच १९७२च्या वन्यजीवन संरक्षण कायद्याच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) वन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार दिले आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.  देशात हत्ती आणि गेंडय़ांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याची माहिती त्यांनी दिली. २०१३-१४ मध्ये ६३ हत्ती आणि ९१ गेंडे मरण पावले. त्यापूर्वीच्या वर्षी ही संख्या ९१ आणि १४२ होती.
 ५०९ औषधांच्या किमतीत घट
अत्यावश्यक असलेल्या ५०९ औषधांच्या किमती ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटी’ ने ४० टक्क्यांनी कमी केल्या असल्याची माहिती सरकारने  दिली. ६८० औषधांपैकी ५०९ औषधांच्या किमती याद्वारे ठरविण्यात आल्याचे रसायन आणि खत विभागाचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत सांगितले. यापैकी, १२७ औषधांच्या किमती ४० टक्के तर ३४ औषधांच्या किमती ३५ ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे अहिर म्हणाले. याखेरीज, ३० औषधांच्या किमती ३० ते ३५ टक्के, ५७ औषधांच्या किमती २५ ते ३० टक्के  तर ६५ औषधांच्या किमती २० ते २५ टक्क्य़ांनी कमी झाल्याची माहिती अहिर यांनी दिली.
विमानतळांचे खासगीकरण नाही
देशातील विमानतळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी  राज्यसभेत दिली.
केंद्र सरकारच्या कथित खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एएआय) कर्मचारी संघटनेने संपाचा इशारा दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर ही माहिती देण्यात आली. खासगी आणि सरकारी क्षेत्राच्या सहभागातून चार विमानतळांचा विकास करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. त्यात चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि जयपूर या विमानतळांचा समावेश आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विमानतळांबाबत नेमलेल्या टास्क फोर्सच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील ८७ विमानतळ तोटय़ात आहेत. त्यांचा योग्य वापर करण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोबाइलचे दुष्परिणाम
मोबाइल फोनच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जनामुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होत असल्याची माहिती इंडिया काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिली आहे.
याबाबत निर्णायक माहिती उपलब्ध नसली, तरी विविध संशोधनांमधून ही बाब ठळकपणे पुढे आल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाचा समावेश कर्करोग उत्पन्न करू शकणाऱ्या घटकांच्या यादीत केला आहे. मोबाइल किरणोत्सर्गामुळे शारीरिक किंवा मानसिक आजार, प्रजनन क्षमतेवर परिणाम होतात की नाही याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती नसल्याचे आयसीएमआरने सांगितले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 12:55 pm

Web Title: farmers suicide cases rise 26 percent to 1109 in 2014
टॅग : Farmers Suicide
Next Stories
1 आरोपीची मुलाखत घेणे आक्षेपार्हच -गृहमंत्री
2 संसदेत ‘सईद’ गोंधळ!
3 मुफ्तींच्या वक्तव्यावर मोदी यांची नापसंती
Just Now!
X