01 March 2021

News Flash

चलो दिल्ली… आज राजधानीच्या सीमांवर धडकणार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा

दिल्लीच्या चारही सीमांवर काढणार ट्रॅक्टर मोर्चा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजधानीच्या चारही सीमांवर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचालनादरम्यान शेतकरी ट्रॅक्टर संचलनही करणार आहेत, त्याचीच ही रंगीत तालीम असल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध असून हे कायदे मागे घेण्यात यावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, सरकारसोबत कृषी संघटनांच्या नेत्यांची सात वेळा चर्चा झाली मात्र यावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. त्यासाठीच आज राजधानीच्या चारही सीमांवर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये ईस्टर्न आणि वेस्टर्न पेरिफेरस एक्सप्रेसवे वरही हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

गाजियाबादच्या उत्तर प्रदेशच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी १३५ किमी लांबीच्या ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे वर प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या आपल्या ट्रॅक्टर मोर्चाची रंगीत तालीम करणार आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ सह दोन राष्ट्रीय महामार्गांवरुन जाणाऱ्या लोकांना या रंगीत तालीममुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे की, हे शेतकरी आज दिल्लीत प्रवेश करणार नाहीत. तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे वर ट्रॅक्टरांना परवानगी नाही.

गाजीपूर सीमेवर रंगीत तलीम

गाजीपूर सीमेवर भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं की, आजचा आमचा ट्रॅक्टर मोर्चा डासना, अलिगड रोडपर्यंत जाईल आणि त्यानंतर गाजीपूरला परत येईल. हा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाची रंगीत तालीम आहे. केंद्र सरकारसोबत पुढील चर्चेचं उद्या आयोजन करण्यात येणार आहे.

सिंघू सीमेवर मोठी सुरक्षा व्यवस्था

दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. इथे शेतकरी सुमारे दीड महिन्यापासून नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. या ठिकाणीही आज ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण आणि महिलांचा सहभाग

ट्रॅक्टर मोर्चासाठी मोठी तयारी सुरु असून काही महिलांनी या मोर्चासाठी ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. किसान एकता मंचने महिलांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा फोटो ट्विट करत म्हटलं, “जवानांची परेड पाहिली आता शेतकऱ्यांची परेड पाहा. शेतकरीच खरा भारत आहे. शेतकरी होण्यासाठी वय, लिंग, उंची यांची गरज नसते मातीची सेवा करणारा प्रत्येक हात शेतकरी आहे. नारी शक्ती देखील शेतीत बरोबरीची भागीदार आहे. आता ती आंदोलनातही बरोबरीनं उभी आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 10:33 am

Web Title: farmers to hold tractor rally today at four borders of delhi including eastern western peripheral expressways aau 85
Next Stories
1 गोव्यामध्येही शेतकरीविरुद्ध सरकार : IIT साठी जमीन देण्यास गावकऱ्यांचा नकार; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर
2 US Capitol मध्ये डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू
3 प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलगी, मुलगा आणि पत्नीनं जिवंत जाळलं!
Just Now!
X