जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने आधी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवून दाखवावा,’ अशी आव्हानाची भाषा फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. अब्दुल्ला यांनी याआधीही काश्मीरबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र आता या विधानावरुन अब्दुल्ला यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. पाकव्याप्त काश्मीर कोणाच्या बापाचे नसून, ते कधीही भारताचे होऊ शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते.

काँग्रेस नेते आणि माजी खासदार जी. ए. डोगरा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘ते (मोदी सरकार आणि भाजप) पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या गोष्टी करतात. मात्र त्यांनी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा. ते लाल चौकात तिरंगा फडकवू शकत नाहीत. मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या बाता करतात,’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी त्यांच्या पाकव्याप्त काश्मीरबद्दलच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले. ‘जर तुम्हाला सत्य ऐकायचे नसेल, तर मग तुमच्या कल्पनेच्या विश्वातच राहा. पाकव्याप्त काश्मीर आपला नाही, हे सत्य आहे आणि आपला जम्मू-काश्मीर त्यांचा नाही. हेच वास्तव आहे,’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले. ‘पाकव्याप्त काश्मीर कोणाच्या बापाचे नसून, ते कधीही भारताचा होऊ शकत नाही,’ असे वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वीच त्यांनी केले होते.

तुम्ही अशी विधाने करुन भारतीयांच्या भावना दुखावता, असे तुम्हाला वाटत नाही का?, असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘भारतीयांच्या भावना म्हणजे काय असतात? मी भारतीय नाही, असे तुम्हाला वाटते का?,’ असे प्रतिप्रश्न त्यांनी केले. ‘तुम्ही कोणाच्या संवेदनाबद्दल बोलत आहात? ज्यांना आमच्या समस्या दिसत नाहीत, अशांच्या संवेदनाबद्दल तुम्ही बोलत आहात का? ज्यांना सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न कळत नाहीत, अशांच्या भावनांबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारत आहेत?’, असे प्रतिप्रश्न अब्दुल्ला यांनी पुढे बोलताना विचारले.