News Flash

भारत, पाकिस्तानातील काही हितसंबंधींना काश्मीरमध्ये शांतता नको

उद्योजकांना राज्यात गुंतवणुकीसाठी येण्याचे आवाहन करताना अब्दुल्ला यांनी सांगितले

भारत व पाकिस्तान या देशातील काही हितसंबंधी लोकांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होणे नको आहे,असा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

उद्योजकांना राज्यात गुंतवणुकीसाठी येण्याचे आवाहन करताना अब्दुल्ला यांनी सांगितले, की तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम  काश्मिरी लोक  तुम्हाला देतील. पाकिस्तान व भारतातील काही लोकांना काश्मीरमध्ये शांतता नको आहे. त्यांना काश्मीर खोऱ्यात अस्थिरता व विद्वेषच हवा आहे. कारण त्यातच त्यांचे अस्तित्व सामावलेले आहे. उद्योजक मेळाव्यास जगातील ५७ देशातील  १३००० उद्योजक उपस्थित होते.

उद्योजक संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की या हितसंबंधी लोकांना सगळीकडेच दुफळी हवी आहे. हितसंबंधी लोक सगळीकडेच आहेत, त्यात काही राजकारणात, काही लष्करातही आहेत. अनेक लोकांना यातून अर्थप्राप्तीही होत आहे, त्यामुळे आपण या लोकांना दूर केल्याशिवाय काश्मीर प्रश्न सुटणार नाही. शांतता व समृद्धी हवी असेल तर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे.

काश्मिरी पंडितांच्या स्थितीबाबत व त्यांनी काश्मीरमध्ये परत येण्याबाबत विचारले  असता अब्दुल्ला यांनी सांगितले, की ज्यांना कुणाला परत यायचे असेल ते येऊ शकतात. त्यासाठी इतके दिवस ते ज्या मुस्लीम समाजाबरोबर सुसंवाद व शांततेने राहिले त्या मुस्लीम समुदायालाही त्यांनी त्यांचा एक अवकाश दिला पाहिजे.अनेक काश्मिरी पंडितांना येथे यावेसे वाटत नसेलही कारण ते कधीच येथे नव्हते, इतरत्र स्थायिक झाले. जे जुने पंडित आहेत त्यांना खोऱ्यात परत यावेसे वाटत असेल यात शंका नाही. त्यांच्यापैकी अनेकांनी मालमत्ता कवडीमोलाने विकल्या आहेत. काश्मीर खोरे पाकिस्तान होईल, या भीतीतून त्यांनी केले, पण ते खरे नव्हते.

मुस्लीम समाजाच्या मनात त्यासाठी पुन्हा स्थान निर्माण करण्याची गरज आहे. फाळणीच्यावेळी याच मुस्लिमांनी भारतात राहण्याचे मान्य केले होते. उद्योजकांनी काश्मीर खोऱ्याला गुंतवणुकीसाठी भेट द्यावी. काश्मीर हे मुस्लीम बहुल राज्य आहे याचा अर्थ आम्ही भारतीयच नाही असा नाही. आम्ही भारत आमचा आहे असे मानतो. तुम्ही येथे आलात तर तुम्हाला येथील लोकांकडून प्रेमच मिळेल यात शंका नाही. काश्मीर भेट देण्यासाठी सुरक्षित आहे का असे लोक विचारतात, त्यावर माझा प्रश्न नवी दिल्ली सुरक्षित आहे का. कारण तुम्ही अगदी दिल्लीत जरी गेलात करी काही होऊ शकते. तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, लूट होऊ शकते. पण काश्मीर सुरक्षित नाही व तेथे भेट देणे योग्य नाही असा समज निर्माण करण्यात आला आहे.

अजूनही काश्मीरमध्ये सगळीकडे मंदिरे व मशिदी आहेत. लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. फाळणीच्यावेळी आम्ही सगळे सोडून इकडे आलो व काही लोक आम्हाला देशद्रोही म्हणतात. आमच्याकडे काही कलमे वेगळी आहेत. कलम ३५ ए व ३७० अन्वये आम्हाला वेगळा दर्जा दिला आहे. तो काढून घेऊ नये कारण तो राज्यासाठी महत्त्वाचा आहे. कुणाचा छळ केला जाणार नाही, कुणाचे फोन टॅप केले जाणार नाहीत, कुणाला लक्ष्य केले जाणार नाही, सर्वाना स्वातंत्र्य राहील अशी आशा आहे. मी भारत माता की जय म्हणण्याच्या बाजूने आहे. भारत माता की जय जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मनापासून म्हणतो.  भारत माता की जय म्हटल्याने लोकांनी माझ्यावर हल्लेही केले. काही लोकांना देश पुढे जाऊ द्यायचा नाही, त्यांना खोऱ्यात शांतता नको आहे.

काश्मीरची नकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांवर करताना त्यांनी सांगितले, ‘माध्यमांनी यात विध्वंसक भूमिका पार पाडली. प्रसारमाध्यमे खोटय़ा बातम्या पसरवत आहेत. लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्याच्या बातम्या दिल्या जात नाहीत.काश्मीर खोऱ्यात बंधुभाव आहे. जे पर्यटक येतात ते इतके प्रेम देशात कुठे मिळत नाही हेच सांगतात.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:05 am

Web Title: farooq abdullah on pakistan
Next Stories
1 पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत यायला हवे; धर्मेंद्र प्रधान यांचा भाजपाला घरचा आहेर
2 हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू : राजू शेट्टी
3 एअर इंडियाने चुकीच्या धावपट्टीवर उतरवले विमान; १३६ प्रवाशी थोडक्यात बचावले
Just Now!
X