केरळमधील काँग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीच्या फेसबुक पोस्टवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या फेसबुक पोस्टमध्ये बलात्कारासंबंधी वादग्रस्त भाष्य करण्यात आले होते. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी अन्ना लिंडा एडनला चांगलेच सुनावले आहे. महत्वाचं म्हणजे अन्ना एडन स्वत: पत्रकार आहेत.

“नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही विरोध करु शकत नसाल तर त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा” या पोस्टसोबत कोचीमध्ये त्यांच्या घराजवळ पाणी तुंबल्याचे दोन व्हिडिओदेखील पोस्ट केले. पती हिबी एडन आईस्क्रीम खात असल्याचाही सोबत फोटो होता. अन्ना एडन यांना या पोस्टवरुन युझर्सनी फैलावर घेतल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली व माफी मागितली.

घराबाहेर असलेल्या पूरस्थितीवरुन मस्करी करण्याचा अन्ना एडन यांचा प्रयत्न होता. पण तो त्यांच्यावर उलटला. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोमवारी ही पोस्ट टाकली होती. लोकांचा संताप पाहून मंगळवारी ही पोस्ट डिलीट केली. अन्ना एडन यांनी नंतर दुसऱ्या फेसबुक पोस्टमधून माफी मागितली.

आणखी वाचा- सावरकरांचं देशासाठी मोलाचं योगदान; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

ज्या महिला या परिस्थितीतून गेल्या आहेत त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी जे शब्द वापरले त्याबद्दल सुद्धा माफी मागते असे अन्ना एडनने आपल्या माफीनाम्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१३ साली माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांनी सुद्धा असेच वक्तव्य केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर आनंद घ्या असे त्यांनी म्हटले होते.