पंजाबच्या जालंधरमध्ये रविवारी घडलेल्या घटनेत जळत्या निखाऱ्यांवर पडून एक सहा वर्षांचा मुलगा होरपळला. एका अनुष्ठानाच्या दरम्यान वडील मुलाला कडेवर घेऊन अनवाणी जळत्या निखाऱ्यांवरून चालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि मुलगा जळत्या निखाऱ्यांवर पडला. आपला देवावर विश्वास असून देव त्याला ठीक करेल असे सांगत मुलाला रुग्णालयात नेण्यास त्याच्या कुटुंबियांनी नकार दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर कार्तिक नावाच्या या मुलास आजुबाजूच्या लोकांनी रुग्णालयात भरती केले. मुलाचे शरीर २० ते २५ टक्के भाजले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वडिलांचेदेखील जवळजवळ १५ टक्के शरीर भाजले आहे. दोघांच्या जखमा भरण्यास पाच ते सात दिवसांचा काळ लागेल.
देवी मरिअम्माच्या सन्मानार्थ जालंधरच्या काजी मंडीत आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक सोहळ्यात जवळजवळ ६०० भक्त जमले होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी जळत्या निखाऱ्यांवरून चालण्या आधी भाविकांना सात दिवस उपवास ठेवावा लागतो. स्थानिक बीजेपी विधायक मनोरंजन कालिया यांनी जखमी पिता-पुत्राची भेट घेऊन दोघांना १०,००० रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. दोघांना उपचारासाठी ‘पंजाब इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’मध्ये भरती करण्यात आल्याची माहिती मनोरंजन यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी याच परंपरेदरम्यान घडलेल्या घटनेत आई आपल्या मुलीसह जळत्या निखाऱ्यावर पडून होरपळली होती.