घरच्या सूनेने नोकरी करणे राजपूतांच्या शान, सन्मानाला शोभत नाही अशी विचारधारा बाळगणाऱ्या एका व्यक्तिने आपल्या सूनेचा शिरच्छेद केला. राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात खातुशाम मंदिराजवळ गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. सदर महिला शहाजहापूर येथील फॅक्टरीमध्ये जात असताना आरोपीने तलवारीने महिलेचे मुंडके उडवले. भररस्त्यात या महिलेची हत्या झाली. पण कोणीही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

उमा असे मृत महिलेचे नाव आहे. तिला दोन मुले आहेत. पतीच्या वडिलांच्या मोठया भावाने ही हत्या केली. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव मामराज आहे. मुलांचे शिक्षण आणि घर चालवण्यासाठी उमा आणि मुकेश दोघे नोकरी करत होते. कुटुंबिय आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर समजले कि, उमाचे सासरे मामराज यांना तिचे नोकरी करणे अजिबात पसंत नव्हते. त्यांचा उमाच्या घराबाहेर पडून नोकरी करण्याला विरोध होता.

राजपूत घरातील महिला नोकरी करत नाहीत. हे राजपूत अभिमानाच्या विरोधात आहे असे मामराज अनेकदा बोलून दाखवायचा. या मुद्यावरुन उमा आणि मामराजमध्ये अनेकदा वाद झाला होता. उमा याआधी शाळेत नोकरी करायची त्यावरुन सुद्धा मामराजने तिच्याबरोबर अनेकदा वाद घातला होता असे आरोपी गजेंद्र सिंहने सांगितले. काही शेजाऱ्यांच्या मते मामराज हा मानसिक दृष्टया अस्थिर असून त्याने त्याची जमीन, मालमत्ता विकून टाकली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.