अनेकदा मुलं आपल्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन लग्न करतात. मात्र लग्नानंतर जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होते. जबरदस्ती करण्यात आलेल्या या लग्नाने दोन कुटुंब जुळतात, मात्र मन जुळत नाही. लग्न अयशस्वी ठरलं तर सर्व दोष आपल्या आई-वडिलांवर टाकून मुलं मोकळी होतात. अनेकदा हे सर्व टाळण्यासाठी तरुण-तरुणी पळून जाण्याचा मार्ग स्विकारतात. आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये जबरदस्ती लावण्यात आलेलं लग्न एका पित्याला महागात पडलं आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बिहारमधील समस्तीपूर येथे ६५ वर्षीय रोशन लाल यांना २१ वर्षीय तरुणीसोबत लग्न करावं लागलं आहे. या लग्नाची बातमी कळताच संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात असून, असा कोणता नाईलाज झाला होता जे त्यांना आपल्या होणाऱ्या सुनेसोबत लग्न करावं लागलं असा प्रश्न विचारला जात होता.

लोकांनी जेव्हा रोशन लाल यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी नाईलाजास्तव हे लग्न करावं लागलं असल्याचं सांगितलं. मुलगा लग्नासाठी तयार असतानाही असा कोणता नाईलाज झाला होता असा प्रश्न सर्वजण विचारत होते. रोशन लाल यांच्या मुलाचं सपना नावाच्या तरुणीसोबत लग्न जुळलं होतं.

वरात मुलीच्या दारात पोहोचली असता सर्वांनाच धक्का बसला. कारण लग्न लागण्याआधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला होता. रोशन लाल यांच्या मुलाचं दुसऱ्या तरुणीवर प्रेम होतं. पण वडील रोशन लाल यांच्या भीतीने लग्नासाठी होकार देत तो लग्नात पोहोचला होता. पण ऐनवेळी त्याने लग्नातून पळ काढला.

समाजातील आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी रोशन लाल यांनी होणाऱ्या सुनेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी चर्चा करुन अखेर यावर सहमती दर्शवली आणि रोशन लाल यांचा विवाहसोहळा पार पडला.