उत्तर प्रदेश बरेलीमधील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम या धर्मगुरुने निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याचा फतवा जारी केला आहे. निदा खान सतत इस्लाम विरोधात बोलत असते. त्यामुळे उद्या जर ती आजारी पडली तरी कोणी तिला औषधे देऊ नयेत. मृत्यूनंतरही तिच्यासाठी कोणी नमाज पठण करु नये तसेच तिच्या अंतिम यात्रेला म्हणजे जनाजाला कोणीही जाऊ नये. निदाला मृत्यूनंतर मुस्लिम दफनभूमीमध्ये जागा देऊ नये असे इमाम मुफ्ती खुर्शीद आलम यांनी त्यांच्या फतव्यामध्ये म्हटले आहे.

जो कोणी निदाला मदत करेल त्यालाही तीच शिक्षा सुनावली जाईल असे या फतव्यामध्ये म्हटले आहे. आता तिहेरी तलाकवर कायद्याने बंदी असली तरी निदा खानला २०१६ साली तिच्या नवऱ्याने उस्मान रझा खानने तिहेरी तलाक दिला होता. त्यानंतर निदाने एक स्वयंसेवी संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून निदा खान निकाह हलाला, ट्रिपल तलाक या प्रथांमुळे आयुष्य खडतर बनलेल्या महिलांना मदत करते.

निदा जो पर्यंत तिची इस्लाम विरोधी भूमिका सोडून माफी मागत नाही तो पर्यंत कोणीही तिच्याशी संपर्क ठेऊ नये असे धर्मगुरुने त्याच्या फतव्यामध्ये म्हटले आहे. निदा खानचे २०१५ साली उस्मान रझा खान बरोबर लग्न झाले होते. पण त्यानंतर वर्षभराने तिला नवऱ्याने तिहेरी तलाक दिला.

तिने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले व खटलाही जिंकला. लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या मारहाणीमुळे निदाचा गर्भपात झाला होता. तिहेरी तलाकची झळ सोसावी लागल्यामुळे तिने नंतर तिहेरी तलाक, निकाह हल्ला या प्रथांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.

काय आहे निकाह हलाला प्रथा
निकाह हलाला या प्रकारामध्ये पत्नीला घटस्फोट दिला असेल व त्या दोघांना पुन्हा विवाह करायचा असेल तर आधी त्या महिलेला दुसऱ्या पुरूषाशी विवाह करायला लागतो, त्याच्याबरोबर पत्नी म्हणून रहावं लागतं, त्याच्याशी घटस्फोट घ्यायला लागतो आणि नंतरच ती पुन्हा पहिल्या पतीशी विवाह करू शकते.