कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विलंबास एक प्रकारे सरकारच जबाबदार आहे, कारण आम्ही त्याचे फायदे लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
अणुऊर्जा खात्याचे राज्य मंत्री असलेल्या जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकारने महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी साधनसामग्री गोळा केली आहे, या अणुप्रकल्पाबाबत अनेक गैरसमज आहेत व सगळ्या अणुऊर्जा विभागाचे लक्ष या प्रकल्पावर केंद्रित आहे, पण आता पुन्हा त्यात अडथळे आणले जात आहेत. या प्रकल्पाचे फायदे समजून सांगण्यात आम्ही कमी पडलो. अणुऊर्जा ही पर्यावरण स्नेही आहे व त्यातून प्रदूषणरहित ऊर्जानिर्मिती होते. जर आम्ही आमच्याच लोकांना समजून सांगू शकत नसू तर या प्रकल्पात अनेक अडचणी येतील व त्यात दोष आमचाच असेल.
अ‍ॅसोचेमने आयोजित केलेल्या अणुऊर्जा परिषदेत त्यांनी सांगितले की, अणुउर्जेचे धोके भासवले जातात तितके मोठे नाहीत, त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. जैतापूर प्रकल्प त्यामुळेच रखडला आहे. अणुऊर्जेत धोका नाही हे संशोधनातून सिद्ध झाल्याचे लोकांना सांगितले पाहिजे.
अणुऊर्जा खात्याचे सचिव रतनकुमार सिन्हा यांनी सांगितले की, अणुऊर्जा धोकादायक नाही हे समजून सांगणे तसेच चांगले अर्थसल्लागार लाभणे ही अणु ऊर्जा उद्योगातील दोन प्रमुख आव्हाने आहेत. ग्रामीण भागात नकारात्मक माहिती पोहोचवली जाते व जे कमी शिकलेले आहेत असे लोक अणुप्रकल्पात अडथळे आणत आहेत, त्यांना समजून सांगण्याची गरज आहे.