कोविड १९ उपचारात ‘फॅविपीरावीर’ हे औषध उपयोगी असून त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते, असा दावा ‘ग्लेनमार्क’ या औषध कंपनीने केला आहे. ‘फॅविपीरावीर’ हे तोंडावाटे देण्याचे औषध असून त्याच्या चाचण्या घेतल्या असता करोनावर उपचारात ते प्रभावी दिसून आले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनफेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहेत असे ग्लेनमार्क कंपनीने म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या एकूण १५० रुग्णांवर करण्यात आल्या होत्या. फॅविपीरावीर या कोविड १९ रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या गोळ्या ‘फॅबीफ्लू’ नावाने विकल्या जातात.

२०२० मध्ये कंपनीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी या औषधाच्या प्रजातीय आवृत्तीची (जेनरिक व्हर्जन) निर्मिती करण्याचा परवाना जारी केला होता. आताच्या निष्कर्षांमुळे ग्लेनमार्कच्या शेअरची किंमत ०.८० टक्क्य़ांनी वाढून ४८५ रुपये ३०पैसे झाली आहे, असे ग्लेनमार्क औषध कंपनीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले.

* फॅविपीरावीर या औषधाचे अनेक फायदे दिसून आले असून त्यात रुग्ण बरा होण्यास लागणारा कालावधी कमी होतो.

* ऑक्सिजन देण्याची गरज कमी  भासते. फॅविपीरावीर दिले नाही त्यांच्या तुलनेत ज्यांना देण्यात आले त्यांचा रुग्णालयातील कालावधी २.५ दिवसांनी कमी झाल्याचे स्पष्ट झाले.

* हे कोविड विषाणूतील आरडीआरपी वितंचकाचे (एंझाइम) काम रोखते, त्यामुळे विषाणूंची संख्या वाढण्याच्या प्रक्रियेस लगाम बसतो. परिणामी रुग्णाला त्याचा फायदा होतो.