करोनाच्या संसर्गाची काही लोकांमध्ये अवास्तव भीती निर्माण झाल्याचे सध्या चित्र आहे. कारण, करोनाची लागण होण्याच्या भीतीनेच अनेकांनी आपलं जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. हैदराबादमधील एका तरुणाने आपल्याला करोनाची लागण झाल्याच्या भीतीने तलावात उडी घेऊन जीवन संपवले.

तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेला हा ३४ वर्षीय तरुण मूळचा पश्चिम बंगालचा असून सध्या हैदराबाद शहरात वास्तव्यास होता. एका करोना संशयीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने आपल्यालाही करोनोची बाधा झाली असावी अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत शहरातील हुसैनसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून तो एका खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेत होता. त्यानंतर त्याच्यामध्ये करोनाच्या आजाराची लक्षण दिसून आल्याने डॉक्टरांनी त्याला खासगी दवाखान्यात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तो खासगी दवाखान्यात अॅडमिट होण्यासाठी गेला. मात्र, तिथं बेड शिल्लक नसल्याने तो अॅडमिट होऊ शकला नाही.

त्यानंतर शुक्रवारी (३ जुलै) संध्याकाळी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने आपल्या मित्राला फोन करुन तलावाच्या बाजूला फिरायला नेण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षातून उतरल्यानंतर तो काही अंतरावर चालत गेला आणि त्याने तलवात उडी घेतली. दरम्यान, रविवारी दुपारी त्याचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला.