एच १ बी व्हिसा असलेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे, त्यामुळे या व्यावसायिकांना अमेरिकी रोजगार बाजारपेठेत काम मिळणे कमी होईल.

अध्यक्ष ट्रम्प यांनी एक अध्यादेश जारी केला असून त्यातील तरतुदीनुसार परदेशी कामगारांना विशेष करून एच १ बी व्हिसा असलेल्यांना यापुढे संघराज्याशी संबंधित कामांची कंत्राटे दिली जाणार नाहीत.

ट्रम्प यांनी सांगितले की, यापुढे संघराज्य सरकार अमेरिकी लोकांनाच कामे देईल. एच १ बी व्हिसा असलेल्या लोकांना कंत्राटे मिळणार नाहीत. त्याबाबतच्या अध्यादेशावर मी स्वाक्षरी केली आहे.

कष्टकरी अमेरिकी लोकांना केवळ स्वस्तातील मनुष्यबळासाठी कामावरून काढून टाकले जाते हे मी खपवून घेणार नाही. एच १ बी व्हिसा नियंत्रण कडक केले आहे. यापुढे अमेरिकी कामगारांच्या जागी परदेशी कामगार दिसता कामा नयेत.

दरम्यान, कोविड १९ साथीविरोधात अमेरिकेने चांगली कामगिरी केली आहे पण भारतात मात्र वाईट परिस्थिती असून चीनमध्येही संसर्ग वाढत चालला आहे असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत ४७ लाख रुग्ण असून १ लाख ५५ हजार बळी गेले आहेत.