पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा शनिवारी शुभारंभ केला. या मोहिमेचे देशभरातून स्वागत करण्यात आले असून एखाद्या उत्सवाप्रमाणे याचे सर्वत्र नियोजन करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यातील लसीकरणात केवळ कोविड योद्ध्यांनाच प्राधान्य देण्यात आलं असून तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, करोनाची पहिली लस घेणाऱ्या देशभरातील कोविड योद्ध्यांनी लसीबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

दिल्ली

एम्स रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे ३४ वर्षीय मनिषकुमार म्हणतात, “या प्रसिद्ध रुग्णालयातील मी पहिलाच व्यक्ती आहे ज्याला ही लस घेता आली. लस घेतल्यानंतर मी ठीक आहे. मला कुठलाही साईड इफेक्ट जाणवलेला नाही. लस घेतल्यानंतर माझी भीतीही निघून गेली आहे. माझ्याकडे पाहिल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी देखील लस घेण्याची इच्छा झाली आहे.” एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील करोनाची लस घेतली. यावेळी ते म्हणाले, “लसीच्या सुरक्षेबाबत आणि प्रभावीपणाबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला अश्वस्त करु इच्छितो.” दिल्ली स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे कोविड लस घेतलेल्या पहिल्या डॉक्टर प्रज्ञा शुक्ला म्हणाल्या, “लस घेतल्यानंतर अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं त्यानंतर मी पूर्णपणे नॉर्मल आहे. ही लस घेण्यात काहीही धोका नाही. मला प्राधान्य दिल्याबद्दल भारत सरकारचे मी आभार मानतो. माझ्या सहकाऱ्यांचाही आता ही लस घेण्याबाबत आत्मविश्वास वाढला आहे.”

मुंबई

देशात करोनाचा सर्वात जास्त फटका हा मुंबई शहराला बसला होता. शहरातील कुपर रुग्णालय हे कोविड लसीकरण केंद्र आहे. या रुग्णालयातील डॉ. जितेन भावसार म्हणाले, “आमच्यासाठी गेले आठ महिने हे खूपच कठीण होते. या काळात आम्ही खूपच ताण-तणावातून गेलो आहोत. आमच्या अनेक सहकाऱ्यांवर कोविड-१९ चा परिणाम झाला होता. मात्र, आता लस घेतल्यानंतर हा आमच्यासाठी खूपच मोठा आणि अभिमानाचा दिवस आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहेत. इतर कोणत्याही लसीप्रमाणेच या सर्वसाधारण लस आहेत. त्यामुळे ही लस घेण्यासाठी संकोच करु नका”

लखनऊ

येथील लोहिया रुग्णालयात पहिली लस घेणारे ५१ वर्षीय अकाउंटंट अरुणकुमार श्रीवास्तव हे तीन मुलांचे वडील आहेत. येथे ते २००८ पासून कार्यरत आहेत. ते म्हणाले, “मी लस घेणार म्हटल्यावर माझी पत्नी सुरुवातीला घाबरली होती. मात्र, मी तिचं मन वळवण्यात यशस्वी ठरलो. माझा आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास आहे असं मी तिला सांगितलं. बऱ्याच काळापासून मी या लसीच्या प्रतिक्षेत होतो त्यामुळे लस घेताना माझा आत्मविश्वास चांगला होता”

कोलकाता

येथील एएमआरआय रुग्णालयाच्या आयसीयूत गेल्या १० महिन्यांपासून नियुक्तीला असलेल्या ५६ वर्षीय डॉ. बिपाशा शेठ म्हणाल्या, “गेल्या १० महिन्यांत आम्ही अनेक जीव वाचवू शकलो तसेच मी अनेकांचे मृत्यूही पाहिले, त्यामुळे आज खूपच आशावादी आहे. लस घेतल्यानंतर माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. इतर लसींप्रमाणेच ही लसही आहे.”

चेन्नई

येथील राजीव गांधी सरकारी सामान्य रुग्णालयाचे डीन थेनारी राजन म्हणाले, “लोकांमध्ये लस घेण्याबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी मी पहिली लस घेतली. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ही दुखण्याविरहित होती.” याच रुग्णालयातील निवासी डॉक्टर असलेल्या डॉ. प्रियंका म्हणाल्या, “मी देखील आज लस घेतली. लस घेण्यापूर्वी मी थोडी काळजी आणि भीती वाटली होती. माझी ही स्थिती अनेक लोक पाहत होते. मात्र, लस घेतल्यानंतर मला खूपच सहज वाटलं. अनेक महिने मी कोविडच्या वॉर्डमध्ये काम केल्याने माझी लस घेण्याची इच्छा होती.”