कसलीही भावना नसलेला धीरगंभीर चेहरा, ओठाला लावलेली उठून दसणारी गुलाबी रंगाची लिप्स्टीक, उंची ५ फूट ४ इंच आणि अंगभर परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या गणवेषातील मेहरून निशाचं कणखर व्यक्तिमत्व निश्चितच लक्षवेधी असं आहे. दक्षिण दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी जेव्हा ती आपले कर्तव्य बजावत असते, तेव्हा अनेकजण मोठ्या कुतूहलाने तिला न्याहाळतात. परंतु, निशावर याचा काहीही परिणाम होत नाही. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी ती हात पाठीमागे घेऊन परिस्थितीवर नजर ठेऊन असते. गेल्या अनेक वर्षांपासून निशा महिला बाऊंन्सर म्हणून काम करते आहे. ती काम करत असलेल्या कंपनीतर्फे लाऊंज, रेस्तरॉं, नाईट क्लब, सोशल पार्टीज् आणि सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी मागणी आणि गरजेनुसार महिला बाऊंन्सर म्हणून तिची नियुक्ती करण्यात येते. बाऊंन्सर या नात्याने अशा गर्दीच्या ठिकाणी कोणी शस्त्र अथवा बंदुकीसह शिरकाव करत नसल्याची खातर जमा तिला करावी लागते. स्त्रियांच्या प्रसाधनगृहात मादक द्रव्याच्या सेवनला अटकाव करण्याची जबाबदारी तिच्यावर असते. स्वत:वरचा ताबा सुटलेल्या मद्यधुंद अवस्थेतील पुरुषांकडून अतिप्रसंग ओढवू नये म्हणून स्त्रियांना सुरक्षा द्यावी लागते. त्याचप्रमाणे मद्याची अधिक मात्रा झालेल्या स्त्रिला सुखरूपपणे तिच्या घरी पोहोचविण्यासारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तिच्या कामाचे स्वरूप पाहता क्वचितप्रसंगी तिला आपला जीवदेखील धोक्यात घालावा लागतो.
मद्यप्राशन केलेला ग्राहक आणि पुरूष बाऊंन्सरदरम्यान एखाद्या वेळी प्रकरण हाताबाहेर गेल्यास महिला बाऊंन्सर म्हणून मध्यस्थी केल्याने फायदाच होतो. जेव्हा एखादा ग्राहक पुरूष बाऊंन्सरबरोबर जोरजोरात भांडतो, तेव्हा आम्ही मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणत असल्याचे अठ्ठावीस वर्षीय निशा सांगते. बॉलिवूड कलाकारांच्या दिल्लीमधील कार्यक्रमादरम्यान निशाने अनेक बड्या कलाकारांबरोबर काम केले आहे. आतापर्यंत तिने शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, विद्या बालन आणि दीपिका पदुकोण इत्यादी बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे.
निशाचा महिला बाऊंन्सर बनण्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. यूपीच्या सहारणपूर जिल्ह्यातील निशाला सहा भावंड असून, त्यात तीन बहिणींचा समावेश आहे. निशाची आई हिंदू तर वडील मुस्लिम धर्मिय आहेत. निशा हे त्यांच तिसरं अपत्य. निशाची आई शशिकला मिश्रा जिल्हा न्यायालयात कारकून म्हणून काम करत होती. तर वडील शौकत अली एका जागेच्या प्रकरणी न्यायालयात येत असतं. याच दरम्यान शशिकला आणि शौकतमध्ये प्रेमाचे सुर जुळले. कुटुंबियांचा विरोध झुगारून निशाच्या आईने शौकतबरोबर लग्न केले. परंतु, शौकत हे अतिशय पुराणमतवादी असल्याचे लग्नानंतर निशाच्या आईच्या लक्षात आले. ते आपल्या मुलींना घराबाहेर पडू देत नसत. आम्हाला अभ्यास करता येऊ नये म्हणून वडीलांनी घरातील वीज कापून टाकली होती. शिक्षण घेतल्याने आम्ही पळून जाऊन आमच्या आवडीच्या व्यक्तिशी लग्न करू, अशी त्यांना भीती होती. दोन बहिणींचे लहान वयातच लग्न लावून देण्यात आले होते. सासरी त्यांचा छळ होत असे. हे पाहिल्यावर आम्हाला रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करता यावा म्हणून आमच्या आईने खूप कष्ट सोसल्याची हृदयद्रावक कहाणी निशाने कथन केली.
टायफॉईडमुळे अंथरुणाला खिळून राहिली नसती, तर निशाचेदेखील वयाच्या चौदाव्या वर्षीच लग्न लावून देण्यात आले असते. आजारपणातून बरी झाल्यानंतर निशाने परिस्थिती आपल्या हातात घ्यायचा निश्चय केला. तिने एनसीसीमध्ये नाव नोंदवले. ५५ किलोच्या अशक्त निशाने आज ८० किलोपर्यंत मजल मारली आहे. खर तर तिला पोलिसात भरती होण्याची इच्छा होती. परंतु, ते शक्य न झाल्याने तिने महिला बाऊंन्सर बनण्याचा अनोखा मार्ग स्विकारला. कालांतराने निशाच्या वडिलांच्या स्वभावातदेखील बदल झाला. त्यांनी निशा आणि तिच्या बहिणीला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली. असे असले तरी पोलीस दलातील नोकरीला त्यांचा विरोध कायम होता. दक्षिण दिल्लीमधील मदनगिर येथील टू-बेडरूम फ्लॅटमध्ये निशा आणि कुटुंबिय वास्तव्याला आहेत. निशात फार बदल झाल्याचे सांगत, राजस्थानी घरची वधू बनून रंगीबेरंगी बांगड्या परिधान करण्याची स्वप्न निशा पाहायची ही आठवण कथन करताना निशाच्या आईच्या चेहऱ्यावर आजही हसू उमटते.

पाहा व्हिडिओ:

निशा आणि तिची बहिण तरंनुम दोघीही बाऊंन्सर म्हणून काम करतात. परंतु, बाऊंन्सरसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात स्थिरावणे त्यांच्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. वडिलांना धंद्यात नुकसान सोसावे लागल्यावर निशाचे कुटुंब २००७ साली दिल्लीमध्ये दाखल झाले. कुटुंबासाठी पैसा कमाविणे निशासाठी प्राधान्य होते. हिंदी भाषेतील पदवीधर निशा नोकरीच्या शोधात वणवण फिरली. अखेर एका दुकानात तिला सेल्सवुमनची नोकरी मिळाली. कालांतराने एका समाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यामार्फत तिला महिला बाऊंन्सच्या नोकरीविषयी पहिल्यांदा समजले. निशाने कराटेचे प्रशिक्षण घेतलेलेच होते. त्यामुळे मोठ्या उत्सुकतेने तिने या नोकरीसाठी अर्ज केला. निशाची या कामासाठी निवड झाली आणि जामिया मिलिया इस्लामिया येथील एका कार्यक्रमादरम्यान कॅम्पसमधील स्त्रियांच्या सुरक्षेची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली. आज चार वर्षांनंतर निशा महिनाकाठी पंधरा हजार रुपये इतकी कमाई करते. आयपीएल, रिअॅलिटी शो ऑडिशन, चित्रपट प्रसिद्धी कार्यक्रम आणि कॉर्पोरेट लंचसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसाठी ती दिवसाला पाचशे रुपये इतकी आकारणी करते.
निशाच्या पाठीवर आज कौतुकाची थाप पडत असली, तरी तिच्या कामाच्या क्षेत्रात रात्री घरी यायला ऊशीर होत असल्याने सुरुवातीच्या काळात तिला शेजारीपाजारी आणि अन्य लोकांकडून टोमणे सहन करावे लागले. मुलगी असावी तर निशासारखी असं म्हणत तीच लोकं आता निशाचं कौतुक करतात.
हल्ली समाज झपाट्याने बदलतो आहे. स्त्रियादेखील पुरुषांच्याबरोबरीने सर्व क्षेत्रात मुक्त वावर करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी महिला बाऊंन्सरच्या मागणीत वाढ होताना दिसते. एक महिला बाऊंन्सर होण्यासाठी सुदृढ शरिरयष्टी, कणखर व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, उंची आणि वजनाचा योग्य ताळमेळ इत्यादी मुलभूत गोष्टी गरजेच्या आहेत. त्याचबरोबर बाका प्रसंग ओढवल्यास प्रसंगी असुरक्षित वाटत असले, तरी ग्राहकाला त्याची जाणीव न करून देता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कसब अंगी बाणावे लागत असल्याचे निशा सांगते.