फ्रान्समधील एका आंदोलनादरम्यान महिला पत्रकारास जोरदार फटका मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. Russia Today ची एक महिला पत्रकार पॅरिसमध्ये चाललेल्या आंदोलनाचे वृत्तांकन करत असताना बुरखा घातलेली व्यक्ती मागून येऊन तिच्या डोक्यावर हाताने जोरात प्रहार करून निघून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच अन्य एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर टाळ्या वाजवून निघून जाते. हे वृत्तांकन करताना सुरक्षेचा उपाय म्हणून डोक्यावर घातलेल्या हेल्मेटमुळे तिच्या डोक्याला जास्त मार लागल नाही. या परिस्थितीतदेखील ती आपले वार्तांकन चालूच ठेवते. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यापासून सदर महिला पत्रकाराविषयी अनेकजण सहानुभूती व्यक्त करत आहेत. कामाच्यावेळी अशा घटनांमुळे आपल्याला फरक पडत नसून, आंदोलनाच्या ठिकाणी वार्तांकन करताना अशा प्रकारांना सामोरे जाण्यासाठी आपण तयार असल्याचे मत तिने व्यक्त केले.
फ्रान्समधील नवीन कामगार कायद्याविरुध्द हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाने नंतर हिंसक वळण घेतल्याने पोलिसांना आंदोलकांवर कारवाई करावी लागली. कारवाईदरम्यान पोलिसांनी ८७ आंदोलकांना ताब्यात घेतले. महिला पत्रकारास फटका मारणाऱ्या त्या बुरखाधारी आंदोलकाचा अद्याप तपास लागलेला नाही.

व्हिडीओ सौजन्य : RNI MEDIA