पाकिस्तानमधील एका २७ वर्षीय महिला पत्रकाराची तिच्या पतीनेच गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचे नाव दिलावर अली असे आहे. दिलावर अली हा स्वत:ही पेशाने पत्रकार आहे. मात्र त्याची पत्नी नोकरी सोडत नसल्यामुळे त्याने तिच्या कार्यालयात जाऊन तिची हत्या केली.

मृत महिलेचे नाव उरूज इकबाल असे आहे. ती एका उर्दू वर्तमान पत्रात वार्ताहराचे काम करत होती. सात वर्षांपूर्वी तिचे दिलावरबरोबर लग्न झाले होते. तिने पत्रकार म्हणून काम करणे हे पती दिलावर अलीला पसंत नव्हते. तिच्या नोकरीवरुन दोघांमध्ये सातत्यानं भांडणं होत असत. परंतु मृत महिला नवऱ्याच्या दबावाला बळी न पडता गेल्या सात वर्षांपासून काम करत होती. यामुळे रागावलेल्या दिलावरनं तिला संपवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी तो पिस्तुल घेऊन किला गुज्जर सिंह येथील तिच्या कार्यालयात घुसला व तिला गोळ्या घातल्या. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर तो तिथून पळून गेला. परंतु पोलिसांनी त्याला शोधून बेड्या ठोकल्या, असं डेक्कन क्रॉनिकल (Deccan Chronicle) या दैनिकानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मृत महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर तिचे नोकरीवर जाणे दिलावर अलीला आवडत नव्हते. पत्नीनं काम सोडाव म्हणून दिलावर तिच्यावर नेहमी दबाव आणायचा त्याचबरोबर मारहाण देखील करत असे. तिने त्याच्या विरोधात अनेकदा पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही, असं मृत महिलेच्या भावाचं म्हणण आहे.