लॉसएंजल्स : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भूकंपाचा इशारा देणारी सूचना यंत्रणा अ‍ॅपच्या स्वरूपात विकसित करण्यात आली असून त्यामुळे भूकंपाच्या आधी सूचना मिळू शकेल, त्यातून थोडय़ा प्रमाणात प्राणहानी टाळणे शक्य होणार आहे.

लोमा प्रिटा येथील  भूकंपाला ३०वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले असून माणसाला भूकंपाची जी जाणीव होते त्याच्या काहीकाळ आधी त्याचा इशारा यातून मिळणार आहे. गव्हर्नर गॅव्हीन न्यूसम यांनी सांगितले,की भूकंपाच्या वेळी थोडा काळ आधी माहिती मिळणेही फायद्याचे ठरू शकते, या भागात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील प्रत्येक व्यक्तीने हे उपयोजन डाऊ नलोड करावे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला जीव वाचवण्याची संधी मिळू शकेल.

सेलफोनवरील या अ‍ॅपचे नाव ‘मायशेक’ असे आहे. त्यातून काही सेकंद आधी भूकंपाचा इशारा मिळतो. जमिनीत जेव्हा भूकंपलहरी उमटू लागतात तेव्हा लगेच हा संदेश हा मिळतो.  त्यामुळे प्राण वाचू शकतात. यातील इशारा सूचना ही ‘शेकअलर्ट’ या सम्ॉफ्टवेअरच्या मदतीने जारी केली जाते.  हे सॉफ्टवेअर  अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेचे आहे, त्यात कॅलिफोर्नियातील भूकंपांशी निगडित भूगर्भ हालचालींचे विश्लेषण केले जाते.    लहरी सुरू होताच त्यांची तीव्रता मापली जाते व त्याचा इशारा दिला जातो.