गेल्या काही दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या दरम्यान, कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नव्या कृषी कायद्यांची स्तुती केली. कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हटलं. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामध्ये आपण अनेक अडथळे पाहिले. आता यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होती, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं मोदी म्हणाले.

“शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्रानं कृषी क्षेत्रावर हवं तसं काम केलं नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगलं काम करत आहेत त्यांना अधिक चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे,” असंही ते म्हणाले. भारतातील बाजारांचं आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वात कमी आहे. देश आज प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होतं तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचं मोदी म्हणाले.

परदेशी गुंतवणुकीचा विक्रम

“गेल्या सहा वर्षांमध्ये जगाचा भारतावरील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तर हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. एफडीआय असेस किंवा एफपीआय परदेशी गुंतवणुकदारांनी भारतात विक्रमी गुंतवणूक केली आहे आणि आता गुंतवणूक सुरूच आहे,” असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

२०२० या वर्षानं सर्वावर मात केली

“आपण २०-२० सामन्यांमध्ये तेजीनं सर्वकाही बदलताना पाहतो. परंतु २०२० या वर्षानं सर्वांवरच मात केली आहे. या काळात आपल्या देशानं आणि संपूर्ण जगानं जे चढउतार पाहिले ते काही वर्षांनी आपण आठवलं तरी आपल्याला विश्वास ठेवणं कठिण होईल. ज्या गतीनं परिस्थिती बिघडली त्याच गतीनं ती सुधारतही आहे. महासाथीदरम्यान भारतानं आपल्या नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं. अनेकांचे जीव आपण वाचवले. आज त्याचा परिणाम संपूर्ण देश आणि जग पाहत आहे,”