पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून भाषण केले. यावेळी ते काय घोषणा करतात याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेजची एक महत्वाची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेचं फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष रसेश शाह यांनी स्वागत केले आहे. ते आज तक वृत्तवाहिनीवर बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज खूप मोठे असून सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. गुंतवणूकदार, बाजाराने अपेक्षा केली होती, त्यापेक्षा हे जास्त रक्कमेचे पॅकेज आहे” असे शाह म्हणाले.

“सहा ते आठ लाख कोटी रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकते अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात वीस लाख कोटी त्यापेक्षा जास्त रक्कमेचे पॅकेज जाहीर झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन उद्यापासून या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती देतील. भारतीय अर्थव्यवस्थेचे, उद्योग जगताचे पॅकेजच्या या घोषणेकडे लक्ष होते. ही दिलासा देणारी बाब आहे” असे रसेश शाह म्हणाले. ते ‘फिक्की’चे माजी अध्यक्ष आहेत.