तुर्कस्तानात जी २० देशांची बैठक होत असताना तेथे आयसिसच्या एका संशयित अतिरेक्याने आत्मघाती स्फोट केला. ईशान्य तुर्कस्तानात सीरियाच्या सीमेजवळ ही घटना घडली आहे. यात चार अधिकारी जखमी झाले असून त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी काल रात्री उशिरा गाझियानटेप येथे एका अपार्टमेंटवर छापा टाकला असता या आत्मघाती हल्लेखोराने स्फोट केला. १० ऑक्टोबर रोजी अंकारा येथे झालेल्या दोन स्फोटात १०२ जण ठार झाले होते, त्याच्या तपासाचा भाग म्हणून छापे टाकण्यात आले. त्यावेळी डोंगान येथे शांती मोर्चात स्फोट करण्यात आले होते. आयसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना ते मोटारीने गाझियानटेप येथे जात असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. पोलिसांनी अंकारा येथे सात संशयितांना अटक केली असून त्याला पॅरिसच्या हल्ल्याची पाश्र्वभूमी आहे. पॅरिसमधील शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले आहेत.
हल्ल्यात २० जणांचा सहभाग

पॅरिसवरील हल्ल्यानंतर ओमर इस्माईल मोस्तेफाय या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असली तरी त्याच्या साथीदारांनी सर्बिया, ग्रीस आणि मॅकेडोनिया या देशांमध्ये पलायन केल्याचा तपास पथकाला संशय आहे. या हल्ल्यात २० जणांचा सहभाग असल्याचा अंदाजही तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. या हल्ल्यात तीन भावांचा सहभाग असल्याबाबतही माहिती मिळाली आहे. यापैकी दोन भाऊ फ्रान्समधील असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची नावे इब्राहिम आणि सालेह अशी आहेत. या दोघांनीच हल्लेखोरांना कार उपलब्ध करून दिल्या. तर यातील तिसऱ्या भावालाही ताब्यात घेण्यात आले आहे.