नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि शहीद भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या नापाक कारवायांना भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार आगामी काळात काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काश्मीरजवळील नियंत्रण रेषेच्या दिशेने दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्या आहेत. त्याचबरोबर काश्मीरमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांनी आणखी हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे अजूनही कार्यरत आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Together(BSF &Army) there will be brainstorming, we will come out with more revised SoP, so that such incidents can be minimised: KN Choubey pic.twitter.com/gC53Om8Ph3
— ANI (@ANI_news) May 2, 2017
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवरून काही दहशतवादी नियंत्रण रेषेच्या दिशेने आले असल्याचे दिसून आले आहे. हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये आधीच दडून बसलेले दहशतवादी आपल्या कारवाया वाढवण्याची शक्यता अधिक आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लष्कराच्या छावण्यांवर तसेच बीएसएफच्या चौक्यांवर हल्ले चढवून तेथील तैनात असलेल्या जवानांची हत्यारे लुटण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून केले जाण्याची शक्यता आहे. तसेच बँका लुटण्याचीही शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेले दहशतवादी आणि नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी एकत्र हल्ले चढवल्यास त्याचा सामना करणे भारतीय जवान आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जड जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे हेच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत. लष्कराचे वरीष्ठ अधिकारी आणि बीएसएफचे अधिकारी संयुक्तपणे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी रणनिती तयार करत आहेत. दहशतवाद्यांचे हल्ले परतवून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती बीएसएफचे अधिकारी के. एन. चौबे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 3:58 pm