क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या सर्वात मोठ्या मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फिडेल कॅस्ट्रो डेझ बालार्ट यांनी नैराश्येला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येत आहे. ते ६८ वर्षांचे होते. क्युबातील सरकारी वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिल्याचे ‘रॉयटर्स’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.

फिडेल कॅस्ट्रो यांच्यासारखे दिसत असल्याने त्यांना ‘ज्युनियर कॅस्ट्रो’ नावाने ओळखले जायचे. मागील काही काळापासून ते नैराश्येने ग्रासले होते. उपचारासाठी त्यांना काही दिवस रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही काही विशेष परिणाम न झाल्याने ते काही महिन्यांपासून राहत्या घरीच नैराश्येवर उपचार घेत होते.

मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांच्या टीमकडून नैराश्येवर उपचार घेणाऱ्या डेझ बालार्ट यांनी आज सकाळी आत्महत्या केली असे क्युबाडिबेट या सरकारी वेबसाईटने म्हटले आहे.