फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली आहे. विविध क्षेत्रातील मंडळीना भारतरत्न देण्यात आला असतानाच एखाद्या लष्करप्रमुखांना हा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शनिवारी एका कार्यक्रमात करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. रावत म्हणाले, फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची योग्य वेळ आली आहे. अन्य क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न दिला जातो, मग सैन्यातील पहिल्या लष्करप्रमुखांना का नाही, तेदेखील या सन्मानासाठी पात्र आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली आहे. आता विद्यमान लष्करप्रमुखांनीच मागणी केल्याने सरकार याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
If others can get it (Bharat Ratna),I see no reason why he (Field Marshal KM Cariappa)shouldn't be deserving personality for same-Army Chief pic.twitter.com/oy402pwQgZ
— ANI (@ANI) November 4, 2017
जनरल (नंतर फिल्ड मार्शल) करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वतंत्र भारताचे ते पहिले लष्करप्रमुख होते. अमेरिकेनेही १९५१ मध्ये करिअप्पा यांना सन्मानित केले होते. १९५३ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. १९५६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. १९८३ मध्ये त्यांचा ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन गौरव करण्यात आला होता. करिअप्पा यांनी १९९३ मध्ये बेंगळुरु येथे अखेरचा श्वास घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 4, 2017 1:11 pm