News Flash

करोनाचा कहर अन् प्रचाराचा धडाका…

पश्चिम बंगालमध्ये आज पाचव्या टप्प्यातील मतदान

(संग्रहित छायाचित्र)

महेश सरलष्कर

पश्चिम बंगालमध्ये करोनाचा कहर सुरू असला तरी विधानसभा निवडणुकांचा प्रचारही धूमधडाक्यात सुरू आहे. आज, शनिवारी पाचव्या टप्प्याचे मतदान होत असून, आणखी तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे या रणधुमाळीनंतर राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे.

पश्चिाम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत सहा हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया संपवण्याची मागणी केली. याबाबत शुक्रवारी कोलकातामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेतली. पण, एकाच टप्प्यात उर्वरित टप्प्यांसाठी मतदान घेण्यास भाजपने कडाडून विरोध केल्यामुळे सर्वपक्षीय सहमतीअभावी मतदानाचे टप्पे कमी करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. फक्त संध्याकाळी ७ वाजल्यापासून सकाळी १० पर्यंत सभा, ‘रोड शो’ आदी सार्वजनिक प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.

महाराष्ट्रामध्ये दैनंदिन वाढ ६० हजारांच्या आसपास होत आहे. पश्चिम बंगालमध्ये इतकी रुग्णवाढ झाली तर राज्यात हाहाकार माजेल, पण प्रचार करण्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व्यग्र असल्याने करोनाच्या आपत्तीचे कोणाला काहीही देणेघेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माकपच्या एका कार्यकत्र्याने दिली. तृणमूल काँग्रेसने निवडणुकीचा कालावधी कमी करण्याची मागणी केली असली तरी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरात चार तासांचा जंगी ‘रोड शो’ केला होता, त्यात हजारोंची गर्दी होती.

फक्त तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर प्रत्येक पक्षनेत्यांच्या मोठ्या सभा होत आहेत. शिवाय, उमेदवारांचे आपापल्या मतदारसंघात ‘रोड शो’ आयोजित केले जात आहेत. दिवसभर असे ‘रोड शो’ होत असून किमान हजार-दोन हजारांची गर्दी असते. पुढील आठवड्यात होणाऱ्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी भाजपच्या नेत्यांची दिवसभरात किमान एक जाहीर सभा, दोन ‘रोड शो’ होत आहेत.

कोलकाता आसपासच्या गावांमधून रुग्णवाहिका सातत्याने शहरातील रुग्णालयांकडे धावत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाज दिवसरात्र घुमत आहेत. सेंट्रल एव्हेन्यू भागात महमद अली पार्कजवळ मोठे सरकारी रुग्णालय असून, तिथे फक्त करोनाचे रुग्ण दाखल करून घेतले जातात.

शहरातील बसमध्ये खचाखच गर्दी दिसत असून, बाजारातही खरेदीसाठी झुंबड उडत आहे. बहुतेकजण मुखपट्टी वापरत नसल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत कोलकाता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांतील ११ विधानसभा मतदारसंघांत शेवटच्या टप्प्यात म्हणजे २६ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. इथे प्रचार पुढील आठवड्यात शिगेला पोहोचेल. अन्य मोठ्या शहरांतील निर्बंध कोलकाता शहरात अजून तरी लागू करण्यात आलेले नाहीत.

प्रचारसभा, ‘रोड शो’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुक्रवारी नदिया आणि २४ परगणा उत्तर या दोन्ही जिल्ह्याांतील तेहट्टा, कृष्णनगर, बराकपूर इथे सभा आणि ‘रोड शो’ झाले. कृष्णनगरमध्ये शहांचा ‘रोड शो’ दुपारी १ ऐवजी ३ वाजता सुरू झाला. तोपर्यंत एका चौकात काही हजार नागरिक दाटीवाटीने उभे होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही कोलकाता शहराजवळ ‘रोड शो’ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी आसनसोलमध्ये जाहीर सभा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:36 am

Web Title: fifth phase of polling in west bengal today abn 97
Next Stories
1 नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास मंजुरी
2 महाराष्ट्रातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू दहा राज्यांत
3 कुंभमेळा समाप्तीची घोषणा करणाऱ्या निरंजनी आखाड्याने माफी मागावी!
Just Now!
X