देशात नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात २२ सुरक्षा जवाना हुतात्मा झाल्यानंतर तेथील भेटीत सांगितले. नक्षलवादाबाबत उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांनी म्हटले आहे की, आमच्या सुरक्षा जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. नक्षलवादाविरोधातील लढाई निर्णायक पातळीवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीस मुख्यमंत्री भूपेश बाघेल, वरिष्ठ पोलिस अधिकारी व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित होते. नक्षलवाद्यांनी जोनागुडा व टेकालगुडा या सुकमा व विजापूर जिल्ह््यांच्या सीमेवर असलेल्या गावात केलेल्या हल्ल्यात २२ सुरक्षा जवान ठार तर ३१ जखमी झाले आहेत. बस्तर भागात काल हा हल्ला झाला होता. एकूण जे २२ जवान यात हुतात्मा झाले त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण असून कोब्रा कमांडो दलाचे सात कमांडो तर जिल्हा राखीव दलाचे ८ , विशेष कृती दलाचे ६ जण यांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता आहे.

शहा यांनी सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाई थांबणार नाही, आता ती आणखी तीव्रतेने केली जाईल. या लढाईत आमचा विजय हा ठरलेला आहे.

गृहमंत्री शहा यांनी सांगितले की, त्यांनी देशाच्या वतीने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. या जवानांचा सर्वोच्च त्याग वाया जाणार नाही. नक्षलवादाविरोधातील लढाई आता निर्णायक टप्प्यात नेली जाईल. गेल्या काही वर्षात नक्षलवाद्याविरोधातील ही लढाई निर्णायकतेकडे चालली आहे. त्यातच आताच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना झाली.

आढावा बैठकीत शहा म्हणाले की, मुख्यमंत्री व सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनीच नक्षलवादाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याची सूचना केली आहे याचा अर्थ सुरक्षा दलांचे मनोधैर्य अजून कायम आहे. गेल्या पाच सहा वर्षात सुरक्षा दलांनी अंतर्गत भागात सुरक्षा दलाच्या छावण्या उभारून मोठे यश मिळवले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सुरक्षा दलांनी माओवादी बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे नैराश्यातून माओवादी असे हल्ले करीत आहेत. या भागात विकासाचे प्रकल्पही हाती घेतले जात आहेत फक्त करोनामुळे त्यांची गती मंदावली आहे. आदिवासी लोकांचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री व खासदार यांच्या सूचनांनुसारच काम केले जात आहे. नक्षलवाद्यांबरोबरचा लढा तीव्र करतानाच विकासावरही भर दिला जात आहे.