पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन; पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका

आपला लढा दहशतवाद्यांविरुद्ध आहे, काश्मिरींविरुद्ध नाही, असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुलवामाच्या हल्लेखोरांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल, दहशतवादाला कसे चिरडायचे हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा दिला.

आपली सशस्त्र दले, सरकार आणि आई भवानीचा आशीर्वाद यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. राजस्थानच्या टोंक जिल्ह्य़ातील भाजपच्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. इम्रान यांनी आपले शब्द खरे करून दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मोदी यांनी सुनावले.

पुलवामातील १४ फेब्रुवारीच्या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘दहशतवाद असाच सुरू राहिला तर जगात शांतता नांदणे शक्य नाही. संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध एकवटले आहे. तो पसरवणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी पुढे जात आहोत.’ केवळ भारतच नाही तर पुलवामा जिल्ह्य़ातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत सारे जग आहे, जवान आणि सरकारवर विश्वास ठेवा, असे आवाहनही मोदी यांनी केले. भारतात राहून फुटीरतावाद पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून ती पुढेही सुरू राहील. हा बदललेला भारत आहे, आता दुख सहन केले जाणार नाही.

दुख सोसल्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला दहशतवादाला कसे चिरडायचे हे माहीत आहे. हा नव्या धोरणांचा अंगिकार केलेला भारत आहे, असा इशारा मोदी यांनी दिला.

इम्रान, शब्द खरे करा!

पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या दूरध्वनी संभाषणाची स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांना (इम्रान) लोक त्यांना क्रिकेटपटू म्हणून ओळखतात. मी त्यांना म्हटले -भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली तेवढी लढाई पुरे झाली. त्यातून पाकिस्तानला काहीही मिळाले नाही, प्रत्येक लढाई आम्ही जिंकली आहे. तेव्हा आता आपण गरीबी आणि निरक्षरतेविरुद्ध लढुया.’ त्यावर ते म्हणाले होते, ‘ मोदीजी मी पठाणाचा मुलगा आहे. मी खरे बोलतो आणि खरे तेच करतो.’ आता ते शब्द त्यांनी खरे करून दाखवले पाहिजेत.

दहशतवादामुळे काश्मिरी युवक अस्वस्थ!

दहशतवादामुळे काश्मिरी युवकही अस्वस्थ आहेत. ते दहशतवादाविरोधातील लढाईत ते आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. त्यांना आपण सोबत घेतले पाहिजे. काश्मिरी नागरिक अमरनाथ यात्रेकरूंची काळजी घेतात. वर्षभरापूर्वी यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काश्मिरी नागरिक जखमींचे जीव वाचवण्यासाठी पुढे आले होते, अशी आठवणही मोदी यांनी सांगितली.

.. तर चूक करून चालणार नाही!

दहशतवादाविरोधातील लढाई आपल्याला जिंकायची असेल तर चूक करून चालणार नाही. दहशतवादी हा दहशतवादीच आहे. दहशतवादामुळे काश्मिरी नागरिकही त्रस्त आहेत. दहशतवादाचे बीज मागील सरकारांमुळे रुजले, पण आमचे सरकार काश्मिरी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.