झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दूरध्वनीवरील संभाषणादरम्यान केवळ ‘मन की बात’ केल्याचा आरोप केला होता. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पंतप्रधान मोदींशी नव्हे तर करोनाशी लढा असा सल्ला हेमंत सोरेन यांना दिला आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधानांनी फोन केला त्यावेळी आपले ऐकून न घेता ते फक्त मनाचेच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. “आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं”, असे सोरेन यांनी म्हटलं होतं.

त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी हेमंत सोरेन यांना उत्तर दिले आहे. “देशाच्या पंतप्रधानांविषयी विधान करताना त्यांनी हे विसरू नये की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही साथीची रोगाची समस्या सोडविली पाहिजे, आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान मोदींवर रोष व्यक्त करणे चुकीचे आहे, “अशा कठोर शब्दात आरोग्यमंत्र्यांनी सोरेन यांच्यावर टीका केली आहे.

“करोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली असताना झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटतं की सगळी कामं केंद्रानेच करावीत. करोनासोबत लढा पंतप्रधानांशी नाही,” असे हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.