व्यापार मेळ्यात सादर

चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे. हे ड्रोन विमान निर्यात बाजारपेठेचे आकर्षण ठरले आहे. याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते. चीनच्या लष्कराने सीएच ५ हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे. त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे. या ड्रोन विमानाने ग्राहक देशांचे लक्ष वेधून घेतले आहे, असे चायना डेली या वृत्तपत्राने म्हटले आहे.
इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच ५ हे लष्करी ड्रोन विमान ३००० किलो वजन व ९०० किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते. इतर ड्रोन विमाने केवळ १५०० किलो वजन वाहून नेऊ शकतात. त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान ८० कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अ‍ॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले. प्रगत रडार त्यावर ठेवता येते व ते रडार जाड भिंतीमागे लपलेल्या अतिरेक्यांनाही शोधू शकते. सध्या या ड्रोन विमानाला हल्ला करण्यापूर्वी सूचना द्याव्या लागतात. चीनमध्ये अतिप्रगत यंत्रसामग्री कधी जाहीरपणे मांडली जात नाही, पण सीएच ५ ड्रोन विमान मात्र चीनच्या व्यापार मेळ्यात ग्राहकांसाठी खरेदीस खुले आहे. आतापर्यंत सीएच ३ ड्रोन विमाने परदेशात विकण्यात आली असून सीएच ५ चे निर्यात प्रारूप बाजारात आणले जात आहे. या विमानाने हवेतून जमिनीवर मारा करता येईल, टेहळणी व मालवाहतूकही करता येईल असे प्रमुख निर्माते शी वेन यांनी सांगितले. चीनने सीएच मालिकेतील ड्रोन विमाने कुणाला विकली हे सांगितले नसले तरी ती ईजिप्त, सौदी अरेबिया व इराक या देशांना विकल्याचे मॉस्को येथील सेंटर फॉर स्ट्रॅटेजीज अँड टेक्नॉलॉजीज या संस्थेचे व्हॅसिली काशिन यांनी म्हटले आहे.