जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. या धुमश्चक्रीत एका मेजरसह लष्कराचे चार जवान आणि एक पोलीस शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. पिंगलन भागातील या चकमकीत मेजर विभूती शंकर धोंडिअल (३३), हवालदार शिवराम (३६) आणि शिपाई हरिसिंग (२६) व अजय कुमार (२७) शहीद झाले. मंगळवारी मेजर धोंडिअल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी नितिका यांनी मोठ्या धैर्याने आपल्या पतीला निरोप दिला. नितिका यांचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

तिरंग्यामध्ये लपेटलेले आपल्या पतीचे पार्थिव पाहून नितिका यांना आश्रू अनावर झाले. पार्थिवासमोर उभं राहत मेजर धोंडिअल यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ‘तू माझ्याशी खोटं बोललास की तू माझ्यावर प्रेम करतो. खरं तर तू माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम करायचा. याबद्दल मला इर्षा वाटत आहे पण मी काहीच करु शकतं नाही’, असे भावपूर्ण उद्गार नितिका यांनी शेवटचा निरोप देताना काढले. शहीर मेजर धोंडिअल यांच्या मागे त्यांची पत्नी नितिका, आई सरोज, दोन मोठ्या बहिणी आहेत. मंगळवारी सकाळी धोंडिअल यांना अंतीम निरोप देण्यासाठी कुटुंबियांबरोबरच उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, लष्कराचे जवान, काँग्रेस तसेच भाजपाचे राज्यातील नेते उपस्थित होते.

मेजर धोंडिअल यांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहचले तेव्हा परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली. घराबाहेरील मोकळ्या जागेत मेजर धोडिअल यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पत्नी नितिका यांनी शवपेटीला हाताने स्पर्श केला त्यानंतर त्यांनी आपल्या शहीद पतीच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि रडू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी आपले आश्रू पुसले आणि त्या बोलू लागल्या. ‘तू माझ्याशी खोटं बोललास की तू माझ्यावर प्रेम करतो. खरं तर तू माझ्यापेक्षा देशावर जास्त प्रेम करायचा. याबद्दल मला इर्षा वाटत आहे पण मी काहीच करु शकतं नाही. आम्हा सर्वांच तुझ्यावर प्रेम आहे. तू सर्वांवर प्रेम करायचा. तू देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहेस. देशातील ज्या लोकांना तू कधी भेटला नाही त्यांच्या संपर्कात आला नाही त्यांसाठी जगलास तू. त्यांच्यासाठी तू आपले प्राण दिलेस. मला तुझा खूप अभिमान आहे. तुझी पत्नी असल्याचा मला गर्व होतं आहे. तू मला अनेक गोष्टी शिकवल्या. शांत कसे रहावे, एखाद्या ध्येयाकडे कशी वाटचाल करावी. तुला निरोप देताना त्रास होतोय पण मला ठाऊक आहे तू नेहमी आमच्या आजूबाजूला असशील. माझी सर्वांना विनंती आहे की आमचे सांत्वन करु नका उलट खंबीर व्हा. कारण इथे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांपेक्षा या व्यक्तीने खूप मोठं बलिदान दिलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या माणसाला सलाम करुयात.’ असं म्हणत शवपेटीतील आपल्या शहीद पतीला नितिका यांनी कडकडीत सलाम ठोकत ‘जय हिंद’चा नारा दिला.

सोमवारी मेजर धोंडिअल यांच्यासहीत तीन जवान शहीद झाली ती चकमक १६ तास सुरु होती. भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्यानंतर ही चकमक संपली. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कामरान आहे. तो ‘जैश ए मोहम्मद’चा कमांडर असून पाकिस्तानचा नागरिक आहे. ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव हिलाल अहमद असे आहे. तो स्थानिक असून जैशमध्ये सामील झाला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे.