सोव्हिएत रशियापासून वेगळ्या झालेल्या आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरुन युद्ध सुरु झालं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्धांची घोषणा केली आहे. तोफा, रणगाडे आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही देशांनी शत्रू पक्षाच्या भूप्रदेशावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आर्मेनियाने आपल्या देशामध्ये मार्शल लॉ लागू केला असून आपल्या सर्व सैनिकांना सीमेरेषेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भातील वृत्त स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असोसिएट प्रेसने दिलं आहे.

आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये आझरबैजानच्या लष्कराने सीमेनजीक असणाऱ्या स्टेपनकर्ट या स्थानिक राजधानीच्या शहरातील रहिवाशी प्रदेशावर रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हल्ला सुरु केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आर्मेनियाच्या सुरक्षा दलांनी आझरबैजानची दोन हेलिकॉप्टर्स आणि तीन ड्रोन पडाले. त्याचबरोबर सीमेवर असणारे आझरबैजानचे तीन रणगाडेही अर्मेनियाने उडवले. या संदर्भातील एक व्हिडिओही आर्मेनियाने जारी केला असून त्यामध्ये रणगाडे उडवण्यात आल्याचे दिसत आहे. आर्मेनियाच्या या स्पष्टीकरणावर उत्तर देताना आझरबैजानने आर्मेनियाकडून सशस्त्र दलांच्या मदतीने सुरु असणाऱ्या युद्धासंदर्भातील खुरापती आणि सीमेजवळ असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कारवाई केल्याचे स्पष्ट केलं आहे. आझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने आर्मेनियाने केलेल्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे असं म्हटलं आहे. तर आमच्या एका हेलिकॉप्टरलाही मोठं नुकसान झालं असून वैमानिकाला वाचवण्यात यश आल्याचे आझरबैजानने स्पष्ट केलं आहे.

युद्धाचे कारण काय?

दोन्ही देश चार हजार ४०० वर्ग किलोमीटरच्या भूप्रदेशावरील हक्कावरुन एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नागोर्नो- काराबाख असं या प्रदेशाचं नाव आहे. या प्रदेशावर दोन्ही देश आपला हक्क सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नागोर्नो हा आझरबैजानचा प्रदेश आहे. मात्र यावर आर्मेनियातील जातीय गटांनी ताबा मिळवला आहे.

(फोटो : विकिपीडियावरुन साभार)

१९९१ साली या प्रदेशातील लोकांनी आझरबैजानपासून या प्रदेशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे घोषित केलं. मात्र हा दावा आझरबैजानने पूर्णपणे फेटाळू लावला आणि यावरुनच आता दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहे.