दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील(डीडीसीए) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अन्य पाच सदस्यांविरोधात दहा कोटींचा बदनामीचा खटला दाखल केला. यानंतर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी माझ्याविरोधातही जेटली यांनी बदनामाची खटला दाखल करावा, असे जाहीर आव्हान दिले आहे.
केजरीवालांविरोधात जेटलींचा दहा कोटींचा बदनामीचा दावा
दिल्ली सरकारने रविवारी डीडीसीए प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची घोषणा केल्यानंतर जेटली यांनी लगेचच सोमवारी ‘केजरीवाल टीम’ला कोर्टात खेचले. जेटली यांनी दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात केजरीवाल, कुमार विश्वास, आशुतोष, राघव चड्डा, संजय सिंह आणि दीपक वाजपेयी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला. दरम्यान, डीडीसीए या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी जेटलींना घरचा आहेर दिला. बदनामीचा खटला दाखल करताना जेटली यांनी माझे नाव का टाळले? त्यांनी माझ्याविरोधातही खटला दाखल करावा, असे ट्विट किर्ती आझाद यांनी केले आहे. आझाद यांनी हे ट्विट जेटली यांच्या ट्विटर हॅण्डला टॅग केले आहे. त्यावर जेटली यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.