आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांच्याविरूद्ध करोनाच्या नविन स्ट्रेनबाबत दहशत पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरनूल १ शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर एन ४४०के या नव्या व्हेरियंटबद्दल खोटी माहिती पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन ४४०के व्हायरस हा तुलनेने १५ पट अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे आहे असे सांगून कुरनूलमधील लोकांमध्ये भीती निर्माण केल्याची तक्रार एन चंद्रबाबू यांच्याविरोधात करण्यात आली आहे. दरम्यान, चंद्राबाबूंवर दाखल केलेला गुन्हा खोट्या तक्रारीवर आधारित असल्याचा आरोप टीडीपीच्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे.