करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतही मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय कर्मचारी आणि अन्य कर्मचारी या लढ्यात उतरले आहे. यानंतर बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्विट करत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. परंतु यानंतर चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत तुम्ही तबलिगी जमातवर गप्प का? असा सवाल केला आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

“मुंबई महानगरपालिकेला सलाम. त्यांनी संपूर्ण देशात सर्व राज्यांपेक्षाही अधिक करोनाच्या चाचण्या केल्या आहेत. सर्वाधिक चाचण्या झाल्यामुळेच सर्वाधिक करोनाग्रस्तांची माहिती मिळाली आहे. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठीही त्वरित पाठवण्यात आलं आहे. करोनाशी सामना करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. धन्यवाद महानगरपालिका,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं.

आणखी वाचा- ‘युपी, बिहारमधील लोकं स्वत:च्या राज्यात थांबले तरी देशाचे ५० टक्के प्रश्न सुटतील’, म्हणणाऱ्या प्रध्यापकावर कुमार विश्वास संतापले

जावेद अख्तर यांच्या ट्विटवर अशोक पंडित यांनी टीका केली आहे. “पालिकेच्या सुरू असलेल्या कार्यावर तुमच्या प्रतिक्रियेचा मी आदर करतो. परंतु तबलिगी जमातचा तुम्ही निषेध कराल याची मी वाट पाहत आहे. मुरादाबाद येथील घटनेचीही दृश्य तुम्ही पाहिली असतील,” असं पंडित म्हणाले. यावर जावेद अख्तर यांनी त्यांच्या या ट्विटवर पुन्हा एक ट्विट केलं. “तुम्ही मला अनेक वर्षांपासून ओळखता. कोणी अन्य व्यक्तीनं विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. तुम्ही माझे मित्र आहात आणि माझं तबलिगी जमातसारख्या संस्थांबद्दल माझे काय विचार आहेत? मग ती मुस्लिमांची असो किंवा हिंदूंची,” असं उत्तर त्यांना जावेद अख्तर यांनी दिलं.