चित्रपटासाठी पैसा उभा करण्यासाठी तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारा मोहम्मद कलीमुल्लाह सय्यद आणि त्याच्या प्रेयसीला गुरुवारी रात्री चेन्नई पोलिसांनी बेडया ठोकल्या. खंडणीतून मिळालेल्या ६० लाख रुपयाच्या रक्कमेतून कलीमुल्लाह चित्रपटाची निर्मिती करणार होता. ऑनलाइनवर वेगवेगळे चित्रपट पाहून कालीमुल्लाहने अपहरणाचा कट रचला होता.

पदवीधर असलेल्या कलीमुल्लाहने वेगवेळया चित्रपटात भूमिका केल्या होत्या तसेच मॉडलिंगही करायचा. चित्रपटात भूमिका मिळणे बंद झाल्यानंतर त्याला तिरुमंगलम येथे एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तिथे त्याची अंबिका (२४) बरोबर ओळख झाली. अंबिका त्याची सहकारी होती. महिन्याभरापूर्वी अंबिकाने नोकरी सोडली व शेणॉय नगरमधील अरुलराज व नंदिनी यांच्या घरी नोकरीवर राहिली. अरुलराज पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तर नंदिनी डॉक्टर आहेत.

कलीमुल्लाहकडे स्वत:चे घर आणि गाडी आहे. पण चित्रपट बनवण्याइतपत पैसा नव्हता. त्यामुळे त्याने आणि अंबिकाने अरुलराज व नंदिनी यांची तीन वर्षांची मुलगी अनविकाच्या अपहरणाचा कट रचला. गुरुवारी १२.१५ च्या सुमारास अनविकाला शाळेतून घरी आणण्यासाठी म्हणून अंबिका घराबाहेर पडली. पण दोघीही घरी परतल्या नाहीत. दुपारी सव्वाएकच्या सुमारास अरुलराजच्या मोबाइलवर अंबिकाच्या नंबरवरुन फोन आला.

आम्हा दोघीचे अपहरण झाले आहे असे तिने सांगितले. त्यानंतर काही मिनिटांनी नंदिनीच्या मोबाइलवर कलीमुल्लाहने फोन करुन खंडणीच्या रक्कमेची मागणी केली. त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सात टीम्स बनवल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अंबिका मुलीसोबत लाल रंगाच्या सुमोमध्ये बसल्याचे दिसले. रात्री ९.३०च्या सुमारास रेडहिल्सजवळ पोलिसांनी लाल रंगाची सुमो दिसली. चेक पोस्टवरुन कलीमुल्लाह गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यानंतर कलीमुल्लाहने दिलेल्या माहितीवरुन कोवालम येथील रिसॉर्टमधून पोलिसांनी अनविकाची सुटका केली.